पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । आखाडा बाळापूर

कळमनुरी तालुक्यातील खरवड येथील घरकुलाच्या प्रपत्र ‘ड’ मधुन ‘ब’ यादीमध्ये नाव घेण्यासाठी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तथा क्रॉस चेकिंगचे अधिकारी बालाजी मारुतराव गोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने 10 हजार रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले आहे.

कळमनुरी तालुक्यातील खरवड येथील तक्रारदार व त्याचे वडील, भाऊ या तिघांच्या नावाने घरकुलाच्या प्रपत्र ड यादीमध्ये नावे आली होती. कळमनुरी पंचायत समितीचे अतिरिक्त शिक्षण विस्तार अधिकारी यांची खरवड येथील घरकुलाच्या लाभार्थ्यांच्या यादीची क्रॉस चेकिंग घरकुल सर्व्हेकरिता नेमणूक बालाजी गोरे यांची करण्यात आली होती. तक्रारदारासह त्याचे वडील व भावाची नावे लाभाथ्र्यांच्या ’ड’ यादीतुन ’ब’ यादीत घेण्यासाठी व पहिल्या यादीत अनुदान मिळेल असे आमिष दाखवून 15 हजार रुपयांची लाचेची मागणी बालाजी गोरे यांनी केली होती. तक्रारदाराला ही मागणी मान्य नसल्याने हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजुन 33 मिनीटाला आखाडा बाळापुर येथील हॉटेल तुळजाई येथे तडजोडीअंती दहा हजार रुपयांची लाच तक्रारदाराकडून घेताना एसीबीच्या पथकाने बालाजी गोरे यास रंगेहात पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी रविंद्र थोरात, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, जितेंद्र पाटील यांच्यासह अभिमन्यु कांदे आदींनी केली.