
सामना ऑनलाईन । मुंबई
हुक्का पार्लरवर सरसकट घालण्यात आलेली बंदी अन्यायकारक असून ती उठवण्यात यावी या मागणीसाठी हॉटेल व्यावसायिकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठासमोर बुधवारी सुनावणी होणार आहे.
सिगारेट, विडी यामध्ये निकोटीनचे प्रमाण अधिक असतानाही राज्य सरकारने धूम्रपानावर बंदी घातलेली नाही. मात्र कमला मिल येथील आगीच्या घटनेमुळे तसेच हुक्क्यामुळे आरोग्याचे नुकसान होत असल्याचे कारण देत शासनाने तंबाखूजन्य पदार्थविरोधी कायदा (कोटपा) यामध्ये दुरुस्ती करत 4 ऑक्टोबर 2018 रोजी राज्यभरात हुक्काबंदी केली. शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असल्यामुळे पुण्यातील कार्निवल रेस्टॉरंट आणि इतर हुक्का व्यावसायिकांनी ऍड. अजिंक्य उदाने यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे.





























































