साईमंदिरात हार, फुलं आणि प्रसादावरील बंदी हटणार, साई संस्थान मार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिर्डीच्या साईमंदिरात दोन वर्षांपूर्वी घालण्यात आलेली हार, फुलं आणि प्रसादावरील बंदी लवकरच हटवली जाणार आहे. साईसंस्थानच्या समितीने बंदी हटवण्यासंदर्भात अनुकूलता दर्शवली आहे. न्यायालयाच्या मान्यतेसाठी साईसंस्थानकडून दिवाणी अर्ज दाखल करण्यात आला आहे. बंदी उठल्यानंतर परिसरातील फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

कोविडमुळे दोन वर्षांपूर्वी साईमंदिरात हार, फुलं आणि प्रसाद घेऊन जाण्यास घातलेली बंदी अद्यापही कायम आहे. खाजगी दुकानदारांकडून हार, फुलं आणि प्रसाद विक्रीतून भाविकांची लूट होत असल्याचा वारंवार आरोप होत असल्याने ही बंदी कायम ठेवण्यात आली होती. मात्र काही अपप्रवृत्तीमुळे घेतलेल्या निर्णयाने शिर्डीतील शेकडो व्यावसायिक आणि परिसरात 384 हेक्टर क्षेत्रावर फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. बंदी उठवावी या मागणीसाठी आठ महिन्यांपूर्वी साईमंदिराच्या प्रवेशद्वारावर शेतकरी आणि व्यावसायिक यांनी आंदोलन केले होते. महसूलमंत्री तथा शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केली होती. या समितीच्या अहवालानुसार साईसंस्थानच्या तदर्थ समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला असून न्यायालयाच्या मान्यतेसाठी दिवाणी अर्ज दाखल केलाय. आता साई संस्थान मार्फत भाविकांना रास्त दरात फुलांची विक्री केली जाणार आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी करून मंदिराच्या प्रांगणात साईभक्तांना फुले उपलब्ध करून दिली जाणार आहेत. त्यामुळे साईभक्तांची लूट थांबून परिसरातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळणार आहे.