ईव्हीएमवर बंदी घाला, मत पत्रिकेवर निवडणुका घ्या! ऑनलाईन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ईलेक्ट्रीक व्होटींग मशिनबाबत शंका उपस्थित केल्या जात असून ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे. सजग नागरिकांनी ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात ही मागणी केली असून त्यासाठी ऑनलाईन मोहीम सुरू करण्यात आली आहे. पॉल कोशी नावाच्या नागरिकाने त्याच्या X हँडलवर या मोहिमेत सहभागी होण्यासाठी लिंक दिली आहे. ( https://t.co/1SX6SIM0tT ) 2388 जणांनी आतापर्यंत या मोहिमेत सहभागी होत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीला समर्थन दिले आहे.

पाच राज्यांत नुकत्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने तीन राज्यांत विजय मिळवला. मध्य प्रदेशात भाजपने सत्ता राखण्यात यश मिळवले आहे. मध्य प्रदेशात भाजपविरोधी जनमत असताना भाजपला इतका मोठा विजय कसा काय मिळू शकतो? असा प्रश्न काँग्रेससह इतर विरोधकांना पडला आहे मतदानात 10 तासांपर्यंत वापरल्या गेलेल्या 100 हून जास्त ईव्हीएम मशीन्स या मतमोजणीवेळी 99 टक्क्यांपर्यंत चार्ज कशा काय होत्या, असे सवाल उपस्थित करीत मध्य प्रदेश काँग्रेसने भाजपच्या विजयामागे ईव्हीएमचाच हात आहे, असा आरोप केला आहे. पोस्टल मतदानात काँग्रेसला मतदान मिळत असताना ईव्हीएममध्ये ते अचानक कमी झाले, हे कसे शक्य आहे, असा सवालही काँग्रेसच्या राज्यातील प्रमुख नेत्यांनी उपस्थित केला आहे.

हिंमत असेल तर एक निवडणूक मतपत्रिकेवर घेऊन दाखवा! उद्धव ठाकरे यांचे थेट आव्हान

संपूर्ण वातावरण आणि एक्झिट पोलचे अंदाज विरोधात असताना, निकाल उलटेपालटे लागले असून भाजपला इतके मोठे यश कसे मिळाले याबाबत मतदार प्रचंड संभ्रमात आहेत. त्यामुळे भाजपची इतकी लाट असेल आणि हिंमत असेल तर केवळ लोकसभेची देशभर किंवा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक मतपत्रिकेवर घेऊन दाखवा, असे थेट आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. किमान सिनेटची निवडणूक तरी घ्या, असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला.