
पोलिसांच्या दैनंदिन कामाचं स्वरूप हे अनियमित आणि त्रासदायक असतं. त्यामुळे त्यांना बरेचदा आरोग्याच्या समस्या भेडसावतात. याची दखल एका पोलीस अधिकाऱ्याने घेतली असून त्याने एक मोलाचा सल्ला पोलिसांना दिला आहे.
मध्य प्रदेशच्या इंदूर इथल्या पोलीस अधीक्षकांनी पोलिसांना तंदुरुस्त राहण्यासाठी दिवसाला चार केळी खाण्याचा सल्ला दिला आहे. यासाठी एक पत्रही त्यांनी पाठवलं आहे.
या पोलीस अधीक्षकांचं नाव महेश चंद जैन असं आहे. त्यांनी एका पत्राच्या माध्यमातून त्यांच्या परिक्षेत्रात येणाऱ्या पोलीस स्थानकांच्या प्रमुख अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.
पोलिसांच्या कामाचं स्वरूप आणि वेळ यांमुळे अनेकांना बाहेरचे पदार्थ खाऊन दिवस काढावा लागतो. पण, त्यांच्या तब्येतीवर त्याचा परिणाम होतो आणि त्यांना दीर्घ काळ तंदुरुस्त राहण्यासाठी ज्या पौष्टिक पदार्थांची गरज असते, त्यात केळ्याचा समावेश होतो. त्यामुळे पोलिसांनी केळी खाणं गरजेचं आहे, असं जैन यांचं म्हणणं आहे.
त्यामुळे त्यांच्या परिक्षेत्रातील पोलीस स्थानकांतील पोलिसांनी सकाळी दोन आणि संध्याकाळी दोन अशी चार केळी प्रत्येक दिवशी खावीत. त्याचं जे बिल होईल ते जैन यांच्या कार्यालयात आणून द्यावं. त्यासाठी परिसरातील ठोक केळी विक्रेत्यांशी बोलणं करून नियमित पुरवठा होईल, असं पाहावं असे आदेशही जैन यांनी दिले आहेत.
जैन यांच्या या आदेशामुळे तमाम पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.




























































