
सी लिंक परिसरात मोटरसायकलवर रेस खेळणाऱ्या 20 जणांना वांद्रे पोलिसांनी अटक केली. चेंबूर येथील एकाने व्हॉट्स अॅपवर ग्रुप तयार करून सी लिंक ते विमानतळ ही रेस आयोजित केली होती. रेस जिंकणाऱ्याला 22 हजार रुपये मिळणार होते, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
वांद्रे सी लिंक परिसरात शनिवारी मोटरसायकलची रेस होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. परिमंडळ-9चे पोलीस उपायुक्त अनिल पारस्कर यांनी अधिकाऱयांना सूचना दिल्या. वरिष्ठ निरीक्षक राजेश देवरे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक प्रदीप केरकर, सहाय्यक निरीक्षक बजरंग जगताप आदीच्या पथकाने सापळा रचला. पहाटे पावणेतीन वाजता पोलिसांनी 20 जणांना ताब्यात घेऊन अटक केली. अटक केलेल्यांमध्ये एक डॉक्टर, डिलिव्हरी बॉय, रिअल इस्टेट एजंट, केमिस्ट व्यवसाय आहे. ते सर्व जण चेंबूर, गोवंडी येथील रहिवाशी आहेत. चेंबूर येथील एकाने व्हॉट्सअॅपवर मुंबई रेसिंग नावाचा ग्रुप बनवला होता. सी लिंक ते विमानतळ या मार्गावर रेस आयोजित केली होती. जिंकणाऱयाला 22 हजार रुपये बक्षीस मिळणार होते. पोलिसांनी मोटरसायकली जप्त केल्या आहेत. त्याने रेसिंगसाठी मोटरसायकलमध्ये बदल केला होता का, याचा तपास वांद्रे पोलीस करत आहेत.



























































