हल्लेखोर कोणत्याही धर्माचे असूद्या, सोडणार नाही! दुर्गापुजेदरम्यान घडलेल्या हिंसाचारामुळे संतप्त शेख हसीनांचे उद्गार

बांगलादेशमधील कमिला जिल्ह्यात काही समाजकंटाकांनी दूर्गा पुजेच्या मंडपात तोडफोड केली. या तोडफोडीनंतर दोन गटांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली असून यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या तोडफोडीचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर तब्बल 22 जिल्ह्यांमध्ये त्याचे पडसाद उमटले. अनेक ठिकाणी त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलने झाली. त्यामुळे 22 जिल्ह्यांमध्ये निमलष्करी दलांचे जवान तैनात करण्यात आला आहे.

या घटनेबाबत बोलताना बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की, ”कमिलामधील मंदिरे आणि दुर्गापूजा मंडपावर हल्ला करणाऱ्या कोणालाही सोडले जाणार नाही.” दुर्गा पूजा उत्सवानिमित्त ढाका येथील ढाकेश्वरी राष्ट्रीय मंदिरात आयोजित कार्यक्रमादरम्यान शेख हसीना म्हणाल्या की, ”कमिलामधील हिंसाचाराच्या घटनेचा तपास केला जात आहे. कोणालाही सोडले जाणार नाही. हल्लेखोर कोणत्या धर्माचे आहेत हे महत्त्वाचे नाही.”

पूजेच्या मंडपात कुराण ठेवल्याची अफवा

दुर्गा पूजेच्या मंडपात कुराण ठेवल्याची अफवा कुणीतरी पसरवली होती. त्यानंतर कमिला जिल्ह्यातील या मंडपावर काही समाजकंटकांनी हल्ला केला. त्यांनी पूर्ण मंडपाची तोडफोड केली. त्यानंतर या भागात दोन गटात मोठी हाणामारी होऊन दंगल निर्माण झाली. या दंगलीत चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर चांदपूर, हाजीगंज, चट्टोग्राम, बंशखली या भागातही दंगल झाली. या ठिकाणीही बरेच जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी जमावावर केला गोळीबार

याघटनेची माहिती देताना बांगलादेशी पोलिसांनी सांगितलं की, या हिंसाचाऱ्याच्या घटनेत काही पोलीस अधिकारीही जखमी झाले आहेत. जमावाने पोलिस आणि स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला केला आणि त्यांच्या वाहनांची तोडफोड केली. यानंतर पोलिसांनी 500 हुन अधिक लोक घटनास्थळी उपस्थित असताना गोळीबार सुरू केला. पोलिसांच्या या कारवाईत लोक मारले गेले की नाही हे, हे त्यांनी स्पष्ट केलं नाही.

पोलिसांनी सांगितले की, हिंसाचारप्रकरणी त्यांनी आतापर्यंत 43 लोकांना ताब्यात घेतले आहे. ज्या लोकांनी कमिला पूजास्थळाचा पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला त्यांनाही अटक करण्यात आली आहे. पोलीस उपमहानिरीक्षक अन्वर हुसेन यांनी कमिलामध्ये प्रसारमाध्यमांना सांगितले की, “या घटनेचा तपास सुरू आहे आणि आम्ही सुरक्षा कॅमेऱ्यांचे फुटेज बघून दंगलखोरांची ओळख पटवत आहोत.”