
सामना प्रतिनिधी । मुंबई
राज्यातील रेशन दुकानांवर स्वस्त धान्य घेण्यासोबतच सर्वसामान्य नागरिक आता बँकिंग सुविधेचाही लाभ घेऊ शकणार आहेत. रेशन दुकानदारांना येस बँकेचे व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करता येणार आहे. पॉस मशीनच्या माध्यमातून बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासणे, पैसे काढणे आणि इतर बँकिंग सेवा ग्राहकांना मिळणार आहेत.
22 जानेवारी रोजी प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़मंदिरात ग्राहक जागृतीसंदर्भातील प्रदर्शन व ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात या उपक्रमाचा शुभारंभ होणार आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीमधील बदल, ग्राहक संरक्षण परिषद सदस्यांचा क्रियाशील सहभाग, अन्नभेसळ रोखण्यासाठी केलेले उपक्रम, नियमात आणि अंमलबजावणीमध्ये केलेले बदल, वैधमापन शास्त्र्ा कायदा अंमलबजावणीमध्ये केलेले बदल, राज्य तक्रार निवारण आणि कायद्यातील नवे बदल या विषयांवर तज्ञांद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ग्राहक चळवळीत उत्कृष्ट कार्य करणाऱया व्यक्तींचा सत्कारही यावेळी करण्यात येईल. हे प्रदर्शन दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.
























































