बारसूचे कातळशिल्प अखेर राज्य संरक्षित यादीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजापूर शहरापासून जवळच असलेल्या बारसू येथील कातळशिल्पाला अखेर राज्य शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले असून याबाबतची अधिसूचना 30 नोव्हेंबर 2023 रोजी प्रसिद्ध केली आहे. बारसूचे हे समूह क्रमांक 2 चे कातळशिल्प राज्य शासनाच्या संरक्षित यादीत समाविष्ट झाल्याने आता अन्य कातळशिल्पांना राज्य संरक्षित स्थळांचा दर्जा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वस्तुशास्त्रविषयक स्थळे व अवशेष अधिनियम 1960 अंतर्गत हे समूह क्रमांक 2 चे कातळशिल्प संरक्षित केल्याची अधिसूचना जाहीर केली आहे. बारसू येथील शेतकरी भागोजी बाबाजी जांगळे यांच्या बारसू येथील सर्व्हे नं. 29/2/ब या जमिनीत हे कातळशिल्प असून सदरचे कातळशिल्प हे मध्याश्म युगीन आहे. या कातळशिल्प समूहात एक मनुष्याकृती चित्र असून त्या माणसाचे दोन्ही हात वर असून त्यामध्ये त्याने मासा पकडला आहे. त्याच्या डाव्या बाजूने दोन व उजव्या बाजूने तीन असे पाच मासे त्या मनुष्याकृतीच्या दिशेने येत आहेत. या माणसाचे पाय पाण्यात असून त्या ठिकाणी दोन मासे आहेत व त्याच समांतर रेषेत हवेत उडणारा बगळा दाखवला आहे. त्यामुळे कोकणातील ऐतिहासिक व विशेषत्वाने मद्याश्म युगीन मानवाने निर्माण केलेली कलाकृती म्हणून या कातळशिल्पाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

सर्वात महत्त्वाचे कातळशिल्प
राज्यसंरक्षित झालेल्या या कातळशिल्पाला विशेष महत्त्व असून हे कातळशिल्प म्हणजे मानवाच्या कलेची सुरुवात झाल्याच्या काळ आहे. आजपर्यंत सापडलेल्या दोन हजार चित्रांपैकी सर्वात महत्त्वाचे असणारे हे कातळशिल्प समूह असल्याचे मत निसर्गयात्री संस्थेचे धनंजय मराठे यानी सांगितले.

249.75 चौरस मीटरचे क्षेत्र संरक्षित होणार
शासनाने प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार या संरक्षित केलेल्या कातळशिल्पाचे (स्मारकाचे) क्षेत्रफळ 8.50 मडटर X 3.50 मीटर म्हणजेच 29.75 चौरस मीटर असून त्या कातळशिल्प समूहाच्या चारही बाजूंपासून 10 मीटर म्हणजेच 220 चौरस मीटरचे क्षेत्र संरक्षित करण्यात येणार आहे. म्हणजे कातळशिल्प धरून संपूर्ण 249.75 चौरस मीटरचे क्षेत्र संरक्षित करण्यात येणार आहे.