देश आणीबाणीच्या खाईत, बीबीसीवर छापे; जगभरात छी थूss…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपने आज जणू अवघ्या देशालाच अघोषित आणीबाणीच्या खाईत लोटले. ‘बीबीसी’ या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर एकाचवेळी आयकर खात्याने धाड टाकली आणि देशभरात खळबळ उडाली. हा केवळ आयकर सर्व्हे आहे, अशी हाकाटी पिटत तब्बल 60 अधिकारी या धाडीसाठी कामाला लागले होते आणि खात्याचे महासंचालक मुंबईतून या धाडींवर जातीने लक्ष ठेवून होते हे विशेष! धाड टाकताच दोन्ही कार्यालयांतील सर्व पत्रकार, कर्मचाऱ्यांना मीटिंग रूममध्ये कांsडण्यात आले. त्यांचे मोबाईल फोन, लॅपटॉपही जप्त करण्यात आले. ‘बीबीसी’ने प्रसारित केलेल्या ‘इंडिया-द मोदी क्वेश्चन्स’ या डॉक्युमेंटरीवर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. त्यानंतर या धाडी पडल्याने जगभरात भाजप सरकारची छी थू।़।़ झाली आहे!

या आयकर धाडींची ब्रिटन सरकारने गंभीर दखल घेतली असून या संपूर्ण प्रक्रियेवर आमचे बारकाईने लक्ष असल्याचे सरकारी प्रवक्त्याने म्हटले आहे. 

सकाळी आयकर अधिकाऱ्यांची दोन पथके दिल्लीतील कस्तुरबा गांधी मार्गावरील आणि मुंबईतील सांताक्रुझ येथील ‘बीबीसी’ कार्यालयात घुसली आणि एकच खळबळ उडाली.  करचुकवेगिरीच्या आरोपाखाली आम्ही सर्वेक्षण सुरू केल्याचा दावा आयकर खात्याने केला असून या चौकशीला आम्ही पूर्ण सहकार्य करू, असे ट्विट बीबीसीने केले आहे.

राजकारण तापले

‘बीबीसी’वरील आयकर धाडीनंतर देशातील राजकीय वातावरण तापले असून सर्वच विरोधी पक्षांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र्ा सोडले आहे. भाजपने मात्र या धाडींचे समर्थन केले असून मोदींवरील डॉक्युमेंटरीचा रागच भाजपच्या प्रतिक्रियेतून व्यक्त झाला आहे. बीबीसी म्हणजे जगातील सर्वात ‘भ्रष्ट बकवास कॉर्पोरेशन’ बनले असल्याची प्रतिक्रिया भाजप प्रवक्ते गौरव भाटिया यांनी दिली आहे. बीबीसीने हिंदुस्थानच्या भावनांचा अपमान केला आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीही बीबीसीवर बंदी घातली होती, याची आठवणही भाटिया यांनी काँग्रेसला करून दिली. मात्र ‘बीबीसीवरील कारवाई ही कायद्यानुसारच आहे’ अशी एका ओळीची प्रतिक्रिया देताना भाटिया यांनी संपूर्ण पत्रकार परिषदेत फक्त बीबीसीची पत्रकारिता किती चुकीची आणि हिंदुस्थानसाठी धोकादायक आहे याचाच पाढा वाचला.

मीडियाचा छळ केला जातोय – एडिटर्स गिल्डची प्रतिक्रिया

एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाने या आयकर धाडींची गंभीर दखल घेतली असून पत्रकार आणि वृत्तसंस्थांवर दबाव आणणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. नियमानुसारच अशा चौकशा व्हाव्यात; मात्र पत्रकारांना धमकावणे असा या चौकशांचा हेतू नसावा असे गिल्डने पत्रकात म्हटले आहे. बीबीसीवरील डॉक्युमेंटरीचे प्रसारण आणि त्यापाठोपाठ पडलेली आयकर धाड या घटनाक्रमाबद्दलही एडिटर्स गिल्डने चिंता व्यक्त केली आहे. सप्टेंबर 2021 मध्ये न्यूजक्लिक आणि न्यूज लॉण्ड्री, जून 2021 मध्ये ‘भारत समाचार’च्या कार्यालयावर आयकर धाडी टाकण्यात आल्या होत्या. तर सरकारी यंत्रणांना हाताशी धरून ‘धाड’ टाकण्याचा हा ट्रेंड लोकशाहीसाठी घातक असल्याचे मतही गिल्डने व्यक्त केले आहे.

विनाशकाले…

अदानीप्रकरणी संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी अशी आमची मागणी असतानाच सरकार आता बीबीसीच्या मागे लागले आहे. विनाशकाले विपरीत बुद्धी… अशा शब्दांत काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी टीका केली आहे.

दिवसभरात काय घडले?

स्थळ ः नवी दिल्लीच्या कस्तुरबा गांधी मार्गावरील एचटी टॉवरमध्ये पाचव्या व सहाव्या मजल्यांवर ‘बीबीसी’चे कार्यालय असून सकाळी 11 वाजता आयकर अधिकाऱ्यांचे पथक तेथे पोहोचले.

स्थळ ः मुंबईतील सांताक्रुझ येथे विण्डसर इमारतीत पाचव्या मजल्यावर बीबीसीचे स्टुडिओ आणि कार्यालय आहे. वेळ तीच सकाळी 11ची. आयकर अधिकाऱ्यांचे दुसरे पथक तेथे पोहोचले.

आयकर खात्याचे महासंचालक मुंबईतील मुख्यालयात ठाण मांडून बसलेले. मुंबई आणि दिल्लीतील आयकर धाडींवर जातीने लक्ष ठेवून होते.

तब्बल 60 अधिकारी कामाला जुंपण्यात आले होते. हा आयकर सर्व्हे आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

धाड टाकताच बीबीसीच्या दोन्ही कार्यालयांतील पत्रकार, कर्मचाऱ्यांचे मोबाईल, लॅपटॉप केले जप्त. कर्मचाऱ्यांना मीटिंग रूममध्ये कोंडून ठेवण्यात आले.

सकाळी 11 वाजता सुरू झालेली ही शोध कारवाई आणखी दोन-तीन दिवस सुरूच राहील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

छापे नाही, सर्व्हे म्हणा

बीबीसीवर छापे टाकल्याच्या वृत्ताची जगभरातील मीडियाने तत्काळ दखल घेतली आणि चर्चा सुरू झाली. त्यानंतर आयकर विभागाने तांत्रिक मुद्दा काढून स्पष्टीकरण दिले आहे. हे छापे नाही तर सर्व्हे आहे, असे आयकरने सांगितले. आयकर सर्व्हे म्हणजे व्यवसाय किंवा कामाच्या ठिकाणी जाऊन कागदपत्रांचा शोध घेणे. छापा टाकला जातो तेव्हा कामाच्या ठिकाणाबरोबरच घर किंवा इतर ठिकाणी जाऊन आयकर अधिकारी तपासणी करू शकतात.

काँग्रेस म्हणते, ही अघोषित आणीबाणी

पहिल्यांदा बीबीसीची डॉक्युमेंटरी आली. तिच्यावर बंदी घातली. आता बीबीसीवर आयकर विभागाने धाड टाकली. ही तर अघोषित आणीबाणीच, असे ट्विट काँग्रेसने केले आहे.

व्हॅलेण्टाइन सर्व्हे

आयकर खात्याने हा व्हॅलेण्टाइन डे सर्व्हे केला असताना हे खाते, सेबी आणि ईडी ही खाती भाजप सरकारचे ‘स्वीट हार्ट’ मिस्टर ए (अदानी) यांच्यावर कारवाई कधी करणार, असा सवाल तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी ट्विट करून विचारला आहे.

लक्ष्य फायनान्स डिपार्टमेंट

या आयकर धाडींचे मुख्य लक्ष्य फायनान्स डिपार्टमेंट होते. मुंबईतील बीबीसी स्टुडियोत आयकर अधिकारी पोहचताच त्यांनी या डिपार्टमेंटमधील सर्व कर्मचाऱ्यांचे मोबाईल, लॅपटॉप जप्त केले. दिल्लीतही तोच प्रकार घडला. मोबाईल आणि लॅपटॉपमधील बॅकअप घेतल्यानंतर ते संबंधितांना परत करण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सर्व कर्मचाऱ्यांना मीटिंग रूममध्ये डांबण्यात आले होते. त्यानंतर सुमारे चार-पाच तास ही कारवाई सुरू होती.