
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
क्रिकेटपटूंना विश्वचषक स्पर्धेसाठी जाताना जाताना पत्नी आणि प्रेयसींना सोबत घेऊन जाण्यासाठी बीसीसीआयने परवानगी दिली आहे. कर्णधार विराट कोहली आणि टीम इंडियाच्या खेळाडूंनी याबाबत केलेल्या मागणीला बीसीसीआयने परवानगी दिली आहे. त्यामुळे येत्या काळात इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषकाणध्ये विराटसह अन्य खेळाडूंना देखील पत्नी किंवा प्रेयसीला सोबत नेता येणार आहे.
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शार्त्री यांनी हा मुद्दा प्रशासकिय समितीचे प्रमुख विनोद राय यांच्यापुढे उपस्थित केला होता. याबाबत चर्चा केल्यानंतर वर्ल्ड कपदरम्यान पत्नी-प्रेयसीला सोबत नेण्यास परवानगी दिल्याची माहिती मिळत आहे. मात्र तसे असले तरी एक अट घातली असून विश्वचषकादरम्यान पहिले 15 दिवस पत्नीला किंवा प्रेयसीला सोबत नेता येणार नाही, अशीही अट बीसीसीआयने खेळाडूंपुढे ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांवेळी जवळची व्यक्ती सोबत असल्याच फायदा होतो असे क्रिकेटपटूंनी म्हटले होते. याआधी विदेश दौऱ्यावेळी क्रिकेटपटूंच्या पत्नी व प्रेयसींना सोबत नेण्याची परवानगी देण्यात आली होती. अनेकवेळा आपण विराटची पत्नी अनुष्काला क्रिकेटच्या मैदानामध्ये प्रेक्षक गॅलरीमध्ये पाहिले आहे. विराटने देखील अनुष्का सोबत असल्याने कामगिरी चांगली होत असल्याचे म्हटले होते.



























































