
उन्हाळ्यात अनेकांना नेहमीपेक्षा जास्त केस गळण्याचा त्रास सुरू होतो. अतिव्यस्त जीवनशैली, या दिवसांत केस कोरडे आणि निर्जीव होणे, चमक जाणे इत्यादी अनेक कारणे यामागे असू शकतात. म्हणून उन्हाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात घामामुळे केस ओले होतात. त्यामुळे ते जास्त खराब होतात. त्यात माती, धूळ अडकून ते जास्तच गळू लागतात. यामुळे उन्ह्याळ्यात किमान आठवड्यातून किमान दोन वेळा केस धुणे आवश्यक आहे.
या हंगामात हवा उष्ण असते. गरम हवेच्या संपर्कात आल्याने केस कोरडे होतात. कोरडे केसही लवकर कमकुवत होतात. कमकुवत केस लवकर तुटतात. यामुळे उन्हाळ्यात केसगळती रोखण्यासाठी काही खास टीप्स.
केसगळती कशी रोखावी ?
केस गळायला सुरुवात झाली असेल, तर एसीच्या हवेत जास्त वेळ राहू नका.
केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करू नका.
केसांवर जास्त हीटिंग मशीन वापरू नका.
टाळूमध्ये रक्त प्रवाह वाढवण्यासाठी दररोज व्यायाम करा.
फायबर, व्हिटॅमिन-ई, व्हिटॅमिन-सी युक्त पदार्थांचे सेवन करा.
दिवसातून 2 ते 3 वेळा केस कंगव्याने विंचरा. या सवयीने केस अडकून तुटणार नाहीत.
उन्हाळ्यात केसगळतीची कारणं –
ऊन आणि प्रदूषण
सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्याने आणि प्रदूषणामुळे केस कमकुवत होतात. अतिनील किरणांमुळे केसांची आर्द्रताही कमी होते. केसांमध्ये ओलावा नसल्यामुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात. बाहेर जात असल्यास केसांना टोपी किंवा स्कार्फने झाकून ठेवा. तसेच, केस फक्त सौम्य शांपूने स्वच्छ करा.
पुरेशा प्रमाणात पाणी न पिणे
पुरेसे पाणी न प्यायल्याने केस गळण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात हायड्रेशनची काळजी न घेतल्याने केस कमकुवत होऊन तुटायला लागतात. पाण्याच्या कमतरतेमुळे केस गळण्याची समस्या देखील उद्भवू शकते.
दररोज केस धुणे
उन्हाळ्यात दररोज आंघोळ करणे ही चांगली सवय आहे. पण केस रोज धुवू नयेत. केसांना रोज शांपू आणि कंडिशनर लावल्याने केसांची मुळं कमकुवत होतात. उन्हाळ्यात केस आठवड्यातून 2 ते 3 वेळा धुवा.
केस घट्ट बांधणे
तुम्हालाही नेहमी केस बांधून ठेवायला आवडतात का? या सवयीमुळे केस गळण्याची समस्या उद्भवू शकते. खरं तर, उन्हाळ्यात केस खूप घट्ट बांधल्यामुळे, घाम केसांमध्ये अडकतो. या कारणास्तव, बॅक्टेरिया वाढू लागतात. यामुळे केस गळणे आणि कोंडा होऊ शकतो.




























































