मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ मराठवाड्यात ठिकठिकाणी चक्काजाम; बीड, धाराशिवकडे जाणार्‍या बसेस बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी शुक्रवारी मराठवाड्यात ठिकठिकाणी चक्काजाम करण्यात आला. हिंगोली, धाराशिव, बीड जिल्ह्यांत वाहनांवर दगडफेक करण्यात आली तसेच बसेस पेटवून देण्यात आल्या. त्यामुळे बीड, धाराशिवकडे जाणार्‍या बसेस सकाळपासूनच बंद करण्यात आल्या.

मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ धाराशिव आज तिसर्‍या दिवशीही बंद होते. धाराशिव, कळंब, भूम तसेच ढोकी, तुगावसह अनेक ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. लोहारा येथे आंदोलकांनी एक बस पेटवून दिली. ईट येथे टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला. परभणीत सकल मराठा समाजाच्या वतीने चक्काजाम तसेच जेलभरो करण्यात आला. शहरातील विसावा कॉर्नर तसेच खळी पाटी येथे रास्ता रोको करण्यात आला. सोनपेठ, जिंतूर, सेलू, गंगाखेड, पालम, पूर्णा येथेही आंदोलन करण्यात आले. राणी सावरगाव, माखणी येथेही रास्ता रोको करण्यात आला.

बीड जिल्ह्यात नेकनूर येथे लातूर महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मध्यरात्री बसेसवर दगडफेक झाल्याने शुक्रवारी पहाटेपासूनच बससेवा थांबवण्यात आली. हिंगोली जिल्ह्यात खांडेगाव येथे आंदोलकांनी एक बस पेटवली. गिरगाव, शिरड शहापूर येथे बसवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर हिंगोली आगाराने बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. वसमत तालुक्यात आंदोलकांनी गुराढोरांसह, बैलगाड्या घेऊन आंदोलन केले. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर येथे टायर जाळण्यात आले.