
सामना प्रतिनिधी । बीड
कर्जमाफी अंतर्गतची प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा न करता ती अन्यत्र वापरणाऱ्या या बँकेची चौकशी करण्याचे आदेश विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, लातूर यांनी पारित केले आहेत. ही रक्कम जवळपास पंचवीस कोटी रुपये आहे. भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसलेल्या बीडच्या जिल्हा बँकेचा अजून एक प्रताप उघडकीस आला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अंतर्गत प्रोत्साहनपर रक्कम कर्जदार शेतकऱ्याच्या बचत खात्यात जमा करण्याचे आदेश सरकारने दिले होते. एकीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी देत असताना ज्या शेतकऱ्यांनी कर्ज वेळेवर भरलेली आहे, त्यांना पंचवीस हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला असल्याने ही पंचवीस कोटी रुपयांची रक्कम बचत खात्यात जमा करण्याचे आदेश होते. मात्र ही रक्कम शेतकऱ्यांच्या बचत खात्यात जमा न करता इतरत्र वापरली होती. म्हणजेच या रकमेची अफरातफर अथवा गैरवापर झालेला आहे. त्यामुळे बँक प्रशासन आणि संपूर्ण संचालक मंडळ या गैरप्रकाराला जबाबदार आहे.
विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, लातूर यांनी याबाबत जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांना कलम 79 (1) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अन्वये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत प्राप्त प्रोत्साहनपर लाभाची रक्कम पात्र लाभार्थीचे बचत खात्यात 15 दिवसाच्या आत जमा करावी, असे आदेश बजावले आहेत. मात्र या पैशाची अगोदरच विल्हेवाट लावली असल्याने आता या प्रकरणात काय करावे, हेच बँकेला कळेनासे झाले आहे.
जिल्हा बँकेतील गैरप्रकार पराकोटीला चालला असून शेतकऱ्यांचा कणा समजली जाणारी ही बँक काही बँक बुडव्या लोकांमुळे रसातळाला आलेली आहे. त्यामुळे बॅंकेचे नुकसान होत असून शेतकऱ्याची वाताहत होत आहे. परंतु सरकार मधील काही लोकांकडून जिल्हा बँकेत काम करणाऱ्या लोकांना अभय मिळत असल्याने मस्तवाल पणा वाढला आहे या प्रकरणात बँकेतील दोषींची तातडीने चौकशी करावी अशी मागणी अँड. अजित देशमुख यांनी केली आहे.




























































