जवानांचे स्मारक पुढच्या पिढीला प्रेरणा देईल- जयदत्त क्षीरसागर

278

सामना प्रतिनिधी। बीड

देशाची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी जवानांचे कार्य अविरत असते. बहाद्दर आणि जिगरबाज नवनाथ बहिरवाल यांनी आयुष्यभर देशसेवा केली. निवृत्ती घेऊन गावाकडे परतण्यापूर्वी आपला देह देशाला अर्पण केला. अशा देशप्रेमी जवानासमोर नतमस्तक होत आहोत, त्यांचे हे स्मारक पुढच्या पिढीला दिशा आणि प्रेरणा देईल असे रोहयो फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी म्हटले.

बीड तालुक्यातील पिंपळवाडी येथे शहीद जवान नवनाथ बहिरवाल यांच्या स्मारकाचे उद्घाटन रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार जनार्धन तुपे, प्रा.जगदीश काळे, विलासराव झोडगे, डॉ.योगेश क्षीरसागर, नितीन धांडे, दिनकरराव कदम, रमेश पोकळे, आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले, काही दिवसापूर्वी पिंपळवाडीमध्ये येण्याचा योग आला. शहीद नवनाथ बहिरवाल यांच्या स्मारकाचा विषय निघाला. ते देशसेवेमध्ये असताना त्यांचे दु:खद निधन झाले. त्यांचे हे स्मारक पुढच्या पिढीला प्रेरणा आणि स्फूर्ती देईल. म्हणून आपण हे स्मारक उभे केले आहे. जवान आपले सर्वस्व पणाला लाऊन देशसेवा करत असतात. देशाची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी जवानांचे कार्य अविरत सुरू असते. बहाद्दर आणि जिगरबार नवनाथ बहिरवाल यांनी आयुष्यभर देशसेवा केली. निवृत्ती घेऊन घरी येण्याअगोदरच त्यांनी आपला देह या देशाला अर्पण केला. या गावात शिक्षणाची गंगा आणण्याचे काम स्व.माजी खासदार क्षीरसागर यांनी केले.

त्याच शाळेमध्ये नवनाथ बहिरवाळ यांनी शिक्षण घेतले आणि देशसेवा केली. हा परिसर त्यांना कदापि विसरू शकणार नाही असे त्यांनी म्हटले. देशसेवेसाठी बीड जिल्ह्यातील शेकडो जवान स्वत:ला वाहून घेत आहेत. बहिरवाळ यांचे स्मारक नव्या पिढीला स्फूर्ती देण्याचे काम करेल असे त्यांनी म्हटले. यावेळी विक्रांत हजारी, निवृत्ती डोके, अरूण बोंगाणे, संध्याताई राजपूत, सोनल पाटील, शीतल राजपूत आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या