
उदय जोशी । बीड
बीड जिल्ह्याचे राजकारण ना कोणाला समजले ना उमजले. किती ही कामे करा, विकास करा, हे मुद्दे गौणच ठरतात. ऐनवेळी उदयाला येणारे मुद्दे राजकारण ढवळून काढत असतात. बीड जिल्ह्याच्या राजकारणात यशासाठी संघर्षच करावा लागतो हा इतिहास आहे. सत्तेत असणाऱ्याचा आणि विरोधात असणाऱ्याचा संघर्ष जिल्ह्याने अनुभवला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत संघर्षच बघायला मिळणार आहे. गत लोकसभा निवडणुकीत एकाकी पडलेले स्व. गोपीनाथ मुंडेंच्या मदतीसाठी लेक धावून आली. या वेळी सर्व सोबत असताना ही तीच लेक बहीण म्हणून बहिणीसाठी धाव घेत आहे. आधी पित्यासाठी आता बहिणीसाठी संघर्षच करावा लागणार आहे. डॉ. प्रीतम मुंडे यांच्या यशासाठी पंकजा मुंडेंचा कस पणाला लागणार आहे.

बीड जिल्ह्याच्या राजकारणात माजी खासदार स्व. केशरकाकू क्षीरसागर, स्व. बाबुराव अडसकर, माजी उपमुख्यमंत्री स्व. सुंदरराव सोळुंके, माजी मंत्री शिवाजीराव पंडित या बड्या नेत्यांसह त्यांच्या वारसांना जसा संघर्ष करावा लागला तसाच संघर्ष स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या वाट्याला आला. स्व. गोपीनाथ मुंडे यांनी बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात भाजपा रुजवली, वाढवली. देशाचे नेते झाले, मात्र बीडमध्ये यशासाठी त्याना संघर्षच करावा लागला.

तत्कालीन उपमुख्यमंत्री असताना झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्व. मुंडेंना विजयासाठी झगडावेच लागले होते, तशीच परिस्थिती गत लोकसभा निवडणुकीत पाहण्यास मिळाली होती. मोदी लाट असताना बीडमध्ये मात्र स्व. मुंडे यांना एका एका मताची बेरीज करावी लागली होती. ऐन निवडणुकीत स्व. मुंडे एकाकी पडले होते. सगळे शिलेदार राष्ट्रवादीला जाऊन मिळाले होते. अशा वेळी पित्याच्या प्रचाराची कमान खांद्यावर घेऊन लढली ती कन्या. पित्याच्या यशासाठी पंकजा मुंडे यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला होता. प्रचाराचा धुराळा उडवला होता, विरोधकांना एकट्या तोंड देत होत्या. वैयक्तिक आरोप सहन करत पलटावर ही त्यांनाच करावा लागत होता.
2014 ची निवडणूक खुप गाजली, स्व. मुंडे विजयी झाले. पण संघर्ष करूनच अशीच परिस्थिती पुन्हा निर्माण झाली आहे. बहिणीच्या विजयासाठी तीच लेक बहीण म्हणून रणांगणात उतरली आहे. विकासाचा मुद्दा घेऊन मैदानात उतरलेल्या पंकजा मुंडेंचा कस या ही निवडणुकीत पणाला लागणार आहे. विकासाचा मुद्दा प्रभावी ठरेल की जाती पातीचे राजकारण हे आगामी काळात स्पष्ट होईल, पण आज बीडच्या या रणांगणावर पंकजा मुंडेंचा संघर्ष पुन्हा एकदा पाहण्यास मिळणार आहे.






















































