बीड जिल्ह्यातील पाच नगरपंचायतच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा सोमवारी फैसला; जिल्ह्याचे लक्ष वडवणीकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
election

बीड जिल्ह्यातील निवडणूक झालेल्या पाच नगर पंचायतच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांचा फैसला सोमवारी होणार आहे. केज, आष्टी, पाटोद्यातील नगराध्यक्ष पदासाठी एकच अर्ज असल्याने निवड बिनविरोध होणार आहे. शिरूरमध्ये अध्यक्षपदासाठी दोघांचे अर्ज आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे ते वडवणीकडे. नगराध्यक्षपदासाठी वडवणीत चुरशीची लढत पाहण्यास मिळत आहे.

पाच नगर पंचायतच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक होत आहे. आष्टी, केज आणि पाटोदा या नगर पंचायतच्या नगराध्यक्षपदी कोण असणार हे निश्चित झाले आहे. मात्र, सोमवारी त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. शिरूरमध्ये अध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल झाले आहेत. मात्र बहुमत भाजपाकडे असल्याने शिरूरचा नगराध्यक्षही जवळपास निश्चित आहे. वडवणीत चुरशीची लढत पाहण्यास मिळत आहे. राष्ट्रवादी पुरस्कृत वडवणी बचाव आघाडीकडे 9 जागा आहेत तर भाजपच्या ताब्यात 8 जागा आहेत. वडवणीमध्ये दगाफटका होऊ नये यासाठी स्वत: पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार प्रकाश सोळंके यांनी फिल्डींग लावली आहे. पंचेवीस दिवसांपासून दोन्ही गटाचे नगरसेवक अज्ञातस्थळी होते. या दोन्ही गटाचे नगरसेवक बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. या निवडणुकीमुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वडवणीकडे लागले आहे.