छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेवर आलेल्यांनी बीड जिल्हा मागास ठेवला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून काही दिवसांपूर्वी बीड जिल्हा कार्यकारिणीत फेरबदल करण्यात आले. या नवनियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार व दिवाळीनिमित्त स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना जिल्हा मध्यवर्ती कार्यालय जालना रोड येथे आयोजित या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेंनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. “पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या नियुक्त्या झालेल्या असून पक्षप्रमुखांना अभिप्रेत असे पक्षाच्या बांधणीचे व संघटनात्मक काम सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी करावे”, असे यावेळी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे म्हणाले. तसेच छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्हा मागास ठेवला असल्याची टीका जिल्हाप्रमुखांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

यावेळी पुढे बोलताना त्यांनी सध्या पडलेल्या भीषण दुष्काळातही भाजप सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचे सांगत भाजपच्या सत्तानियंत्रणावर ताशेरे ओढले. उद्योगधंद्यांचा आभाव, सिंचनाची असुविधा, बेरोजगारीची वाढ यातून छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी बीड जिल्हा मागास ठेवला असून यंदाची दिवाळी शेतकऱ्यांसाठी सुखाची नाही तर हालअपेष्ठाची होत आहे. शिवसेना शेतकऱ्यांसोबत कालही होती, आजही आहे अन उद्याही राहील. नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी जास्तीचा वेळ देत त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यास हातभार लावावा असे यावेळी ते म्हणाले.

शिवसेना जिल्हाप्रमुख व शिवसैनिकांच्या वतीने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार समारंभ व दिवाळी स्नेहमिलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन काल सायंकाळी करण्यात आले होते. जिल्हाभरातील शिवसैनिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवत नुकत्याच निवडलेल्या पदाधिकाऱ्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणाऱ्या शिवसेनेत सर्वसामान्यांना संधी दिली जाते. जिल्ह्यात नवनियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ह्या याच धर्तीवर आहेत, सर्वसामान्य शिवसैनिक पदाधिकारी झाल्याने आता शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचेल असा विश्वास यावेळी माजीमंत्री बदामराव पंडित यांनी व्यक्त करत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

जिल्हाप्रमुख खांडेंनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छांसह पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत पक्षविचारधारा व संघटनवाढ जोमात करण्याचे आवाहन सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना यावेळी केले. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, बप्पासाहेब घुगे – (जिल्हा समन्वयक), संजय भाई महाद्वार(जिल्हा समन्वयक),सह पदाधिकारी उपस्थीत होते.