
मासे पकडण्यासाठी पाण्याच्या डोहात सोडलेल्या विजेचा शॉक बसून दोघा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. हे दोघे नात्याने चुलते-पुतणे होते. ही दु:खद घटना बीड जिल्ह्यात धारूर तालुक्यातील काळ्याचीवाडी येथे घडली.
धारूर तालुक्यातील काळ्याचीवाडी येथील दोन तरूण गावापासून जवळच असणाऱ्या डोंगरामध्ये मासे पकडण्यासाठी गेले होते. पाण्यामध्ये विजेचा प्रवाह सोडून मासे मारायचे ही कल्पना त्यांनी अंमलात आणली. मात्र तोच प्रयोग दोघा जणांचा जीव घेऊन गेला.
नात्याने चुलते पुतणे असणारे समाधान सहदेव रूपनर (21), दीपक मारोती रूपनर (19) या दोघांचा दुर्देवी मृत्यू झाला. गुरूवारी दुपारी गेलेले हे दोघे जण सायंकाळी उशिरापर्यंत परत न आल्याने काळ्याच्यावाडी येथील काही ग्रामस्थांना सहदेव रूपनर डोहाकडे गेले. तेव्हा या दोघांचे मृतदेह त्यांना सापडले. या घटनेने धारूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मृत पावलेला समाधान रूपनर हा पोलीस भरतीची तयारी करत होता. तर दीपक रूपनर हा आयटीआय परीक्षा देवून सुट्ट्यामध्ये गावाकडे आला होता. या प्रकरणी धारूर पोलिसात आकस्मिक गुन्ह्याची नोंद झाली आहे. ग्रामीण रूग्णालयामध्ये शवविच्छेदन केले जात आहे.






























































