
कोरोना संकटात मध्य रेल्वेच्या भायखळा येथील बर्कले पॅलेस रेल्वे कॉलनी ‘रेड झोन’ म्हणून जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी 25 वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा खंडित होण्याची परिस्थिती निर्माण झाली होती; परंतु बर्कले गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र तळेकर यांनी ‘सोशल डिस्टन्सिंग’चे सर्व नियम पाळत सात दिवसांचा गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला. कृत्रिम तलावात श्रींचे विसर्जन करीत ही माती सोसायटीच्या सर्व सदस्यांना वाटण्याचा संकल्प त्यांनी केला असून त्यात तुळशीचे रोप लावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
भायखळ्याच्या बर्कले पॅलेस रेल्वे कॉलनामध्ये मध्य रेल्वेचे मोटरमन, गार्ड आणि रेल्वेचे इंजिनीअर राहतात. येथे गेल्या दोन महिन्यांत कमीत कमी 35 रहिवासी हे कोरोनाग्रस्त झाल्यामुळे हा भाग पालिकेने ‘रेड झोन’ घोषित केला होता. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवावर चिंतेचे सावट होते. सर्व कोरोनाबाधित हॉस्पिटल किंवा घरात क्वारंटाइन होऊन बरे झाले होते. 25 वर्षांची गणेशोत्सवाची परंपरा मोडीत येण्याची वेळ आली होती. परंतु एसएसई भालचंद्र काळे, मेल ड्रायव्हर डी.एन. शर्मा, मोटरमन संजय सक्सेना आणि मंडळाचे अध्यक्ष मोटरमन नरेंद्र तळेकर यांनी मनाशी निर्णय पक्का करून हा गणेश उत्सव करण्याचा ठाम निर्णय घेतला. सॅनिटायझिंग, मास्क आणि सामाजिक अंतर राखत यंदा हा उत्सव थाटात पार पडला. विसर्जन करण्यासाठी कॉलनीच्या आवारातच एक छोटेखानी हौद बांधून गणपतीचे विसर्जन त्यात करण्यात आले. मंडळाने गणपतीची विसर्जित माती प्रत्येकाला भेट देत त्यात तुळशीचे रोपे लावण्याचे आवाहन त्यांनी सर्व सभासदांना केले आहे. तसेच सर्व रेल्वे ऑफिसर मंडळींनाही माती आणि श्रीफळ वाटले जाणार असल्याचे तळेकर यांनी सांगितले.





























































