बेस्टकडे झीरो तिकिटाचा हिशेबच नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

बेस्टमध्ये अंधांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा आहे. त्याची भरपाई महापालिकेतर्फे केली जाते. पालिका त्याकरिता बेस्टला सहा कोटींचे अनुदान देते. या प्रवाशांना ट्रायमॅक्सच्या मशीनमधून झीरो तिकीट दिले जात होते. मात्र ट्रायमॅक्सच्या मशीन बंद पडल्यामुळे झीरो तिकीटच दिले जात नसल्याची गंभीर बाब अनिल कोकीळ यांनी निदर्शनास आणून दिली. गेल्या काही महिन्यांत किती अंध आणि ज्येष्ठ नागरिक प्रवाशांनी बेस्टने प्रवास केला याचा कोणताही हिशेब बेस्ट प्रशासनाकडे नाही. त्यामुळे पालिकेचे अनुदान कसे मिळणार, असाही सवाल त्यांनी केला. त्यावर झीरो तिकीट का छापले नाही याचा खुलासा करण्याचे निर्देश अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी प्रशासनाला दिले.

प्रवासी घटले नाहीत… प्रवासी तिकीटच काढत नाहीत

बेस्टचे प्रवासी घटलेले नाहीत तर ट्रायमॅक्सच्या बंद पडलेल्या मशीन्समुळे अनेक प्रवासी तिकीट न काढताच निघून जातात. तर ज्यांच्याकडे पास आहेत त्यांचे पास तपासून बघता येत नाही. बेस्टच्या बसगाडय़ांमध्ये तिकीट देण्यासाठी आणलेल्या ट्रायमॅक्सच्या मशीनपैकी फक्त ३० टक्के मशीनच सुरू आहेत. त्यामुळे बेस्टचा महसूल बुडतो आणि प्रवासी घटल्याचे दिसते, असा आरोप सुहास सामंत यांनी केला. ट्रायमॅक्समुळे बेस्टचे खूप नुकसान होत असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली.
बेस्टच्या ताफ्यात सध्या ३,३०० बसेस असून रस्त्यावर फक्त २८०० बसेस धावतात. त्यातच शेअर रिक्षा-टॅक्सी यामुळेही प्रवासी संख्या कमी होत आहे. महसूल कमी होण्यामागे हे मुख्य कारण आहे, असा मुद्दा अनिल कोकीळ यांनी मांडला. ट्रायमॅक्स मशीन नादुरुस्त असल्यातरी कंपनी दुरुस्ती करण्यास तयार आहे. तरीही प्रशासन मनमानी कारभार करत आहे. तसेच ३० जुनला ट्रायमॅक्स मशीनची मुदत संपत असून त्यानंतर तिकिटाचा दुसरा पर्याय काय, असा सवाल कोकीळ यांनी उपस्थित केला.