भारत बायोटेकला पुण्यातील जागा न्यायालयाच्या निर्देशानुसारच!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारत बायोटेकचा प्लाण्ट पुण्याला पळवल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपकडून होत होती. याला त्यांनी प्रत्युत्तर दिले असून मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच भारत बायोटेक कंपनीला पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथील जागा  कोरोना लसनिर्मिती प्रकल्पासाठी देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.

भारत बायोटेकचा प्रकल्प अजित पवारांनी पुण्याला पळवल्याचा आरोप भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी केला होता. खोपडे यांचा आरोप तद्दन खोटा, जनतेची दिशाभूल करणारा, औटघटकेच्या प्रसिद्धीसाठी, राजकीय सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या आदेशांचे पालन होईल हे पाहण्याची जबाबदारी पुणे जिह्याचा पालकमंत्री म्हणून मी पार पाडली. भारत बायोटेकचा लसनिर्मिती प्रकल्प पुणे, नागपूरसह राज्यात कुठेही झाला असता तरी मला आनंदच झाला असता, असेही पवार म्हणाले.

कंपनीने स्वतःहून मागणी केली

देशावरील कोरोना संकट आणि लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन भारत बायोटेक लस उत्पादक कंपनीने स्वतःहून पुण्यात लसनिर्मिती प्रकल्पासाठी जागा मिळावी, अशी मागणी केली होती. त्यासाठी भारत बायोटेकने मांजरी येथील बंद पडलेल्या ‘इंटरवेट इंडिया प्रा लि.’ (बायोवेट)  कंपनीची जागा मिळावी, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. त्या प्रस्तावावर तातडीने निर्णय व्हावा म्हणून भारत बायोटेकने उच्च न्यायालयात धाव घेतली  आणि दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने कोरोनाचे संकट आणि लसनिर्मितीची गरज लक्षात घेऊन पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी येथे भारत बायोटेकचा प्रकल्प सुरु करण्याचे निर्देश दिले. राज्याचा उपमुख्यमंत्री आणि जिह्याचा पालकमंत्री म्हणून न्यायालयाच्या आदेशाचे पालन सुनिश्चित करण्याची जबाबदारी पार पाडली, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.