‘बुरगुंडा’कार भारुडरत्न निरंजन भाकरे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

’तुला बुरगुंडा होईल बया गं’ या भारुडाने तर केवळ महाराष्ट्र नव्हे तर देश आणि अगदी अमेरिकासुद्धा गाजवून सोडणारे भारुडरत्न निरंजन भाकरे यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. भाकरे यांच्याकर संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने मोठी हळहळ व्यक्त होत असून भारुड परंपरेतील अनमोल रत्न हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

भाकरे यांचा जन्म 10 जून 1965 रोजी सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद गावचा. त्यांना वडिलांकडून भजनाचा वारसा मिळाला. लहानपणी त्यांनी छोटय़ा कलापथकात हार्मेनिअम वाजविण्याचे काम केले. पुढे अशोक परांजपे यांनी लोककलेचा मार्ग दाखविला आणि भाकरे यांनी पूर्ण आयुष्य लोककलेला वाहून घेतले.

अखिल भारतीय नाटय़ संमेलने, साहित्य संमेलने, लोककला संमेलने, संत गाथा अशा अनेक कार्यक्रमांतून भाकरे यांनी लोककलेचे सादरीकरण केले. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत ते विद्यार्थ्यांना भारुडाचे प्रशिक्षण देत होते. देहदानाचा संकल्प करणारे भाकरे हे पहिले लोककलावंत होते. मात्र कोरोनामुळे त्यांची इच्छा पूर्ण होणार नाही. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा शेखर असा परिवार आहे.

निरंजन भाकरे यांनी 90 मीटर कापडाचा पायघोळ तयार करून घेतलेली गिरकी चर्चेत होती. मुंबईतील एका कार्यक्रमात साडेआठ किलोच्या या पायघोळासह 20 किलो वजनाचा जडसांभार अंगावर घेऊन त्यांनी सलग अडीच तास आपली कला सादर केली होती. या 75 मीटर इंच घेर असलेल्या या पायघोळाच्या गिरकीची नोंद वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती.