भास्कर ठाकूर स्मृति चषकावर व्हिक्टरी क्लबने कोरले नाव, 12 वर्षांखालील गटात विजेतेपद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भास्कर ठाकूर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खेळवल्या जाणाऱ्या भास्कर ठाकूर स्मृति चषकावर व्हिक्टरी क्रिकेट क्लबने नाव कोरले आहे. पीजे हिंदु जिमखाना येथे सिंध स्पोर्ट्स क्लब यांच्यातर्फे आयोजित केली जाणारी ही स्पर्धा 12 वर्षांखालील मुलांच्या गटात खेळवली जाते. यंदा या स्पर्धेत 94 संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचा अंतिम सामना डॅशिंग स्पोर्ट्स क्लब आणि व्हिक्टरी क्रिकेट क्लब या दोन संघांमध्ये गुरुवारी हिंदु जिमखान्यावर रंगला.

35 षटकांच्या या अंतिम सामन्यात व्हिक्टरी क्रिकेट क्लबने पहिल्यांदा फलंदाजी करत तीन गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा ठोकल्या. डॅशिंग स्पोर्ट्स क्लबला विजयासाठी 183 धावांचं आव्हान होतं. व्हिक्टरी क्लबने धारधार गोलंदाजी करताना डॅशिंग स्पोर्ट्स क्लबला १६२ धावांवर रोखत 20 धावांनी विजय मिळवला.

मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सचिव अजिंक्य नाईक यांनीही या स्पर्धेच्या आयोजनाचं कौतुक केलं. 12 वर्षांखालील नव्या दमाच्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा म्हणजे उत्तम व्यासपीठ आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक चांगले खेळाडू पुढे येतील. या स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांची आणि खेळाडूंची संख्या व दर्जा लक्षात घेतला, तर मुंबई क्रिकेटचं भवितव्य किती उज्ज्वल आहे, याची खात्री पटेल, असा विश्वासही नाईक यांनी व्यक्त केला.