हिंदुत्ववाद्यांना कुणी वालीच नाही; नक्षलवाद्यांवरील कारवाईवरून देशभरात हंगामा

सामना ऑनलाईन, मुंबई

पुणे पोलिसांनी नक्षलवाद्यांचे ‘थिंक टँक’ असलेल्या टॉप पाच शहरी माओवाद्यांना अटक करताच देशभरात हंगामा उभा केला जात आहे. या शहरी माओवाद्यांच्या बचावासाठी विविध पक्षांचे नेते, विचारवंत, लेखक, कवी सरसावले आहेत. नामवंत वकिलांची फौज सर्वोच्च न्यायालयात उभी राहिली आहे. हे चित्र पाहून या देशात हिंदुत्ववाद्यांसाठी कुणी वाली नाही. माओवाद्यांसाठी मात्र हंगामा सुरू असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, पाचही जणांना 6 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवा, अटक करू नका, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

पुण्यामध्ये 31 डिसेंबर 2017 ला ‘एल्गार’ परिषद झाली होती. त्याच्या दुसऱ्या दिवशी भीमा-कोरेगाव येथे दंगल उसळली. एल्गार परिषदेतील आयोजनामध्ये नक्षलवाद्यांचा सहभाग आणि शहरी माओवाद्यांकडून आर्थिक मदत केली गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुणे पोलिसांनी मंगळवारी एकाच वेळी मुंबई, ठाणे, हैदराबाद, फरिदाबाद, दिल्लीत छापे टाकून तेलगू कवी वरवरा राव, अरुण परेरा, गौतम नवलखा, व्हरगॉन गोन्साल्विस, सुधा भारद्वाज यांना अटक केली. या अटकेला डावे विचारवंत, लेखक, कवी, राजकीय नेत्यांनी विरोध केला आहे.

मानवाधिकार आयोगाची नोटीस
अटक करताना पुणे पोलिसांनी नियमांचे पालन केले नाही. मानवाधिकाराचे उल्लंघन केले असे स्पष्ट करीत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पोलिसांना नोटीस बजावली आहे. जातीय तेढ निर्माण करण्याचा कट उघड झाला आहे. भीमा-कोरेगाव हिंसाचाराची घटना देशासाठी आणि राज्यघटनेसाठी खूप मोठा धक्का होती. पोलिसांचे खच्चीकरण करणे योग्य नाही. जर निर्दोष असतील तर न्यायालयात दाद मागू शकतात.-हंसराज अहिर (केंद्रीय गृहराज्यमंत्री)

कारवाई अनैतिक आहे. त्याविरुद्ध उद्या दिल्लीत जंतरमंतरवर डाव्या आणि पुरोगामी संघटना आंदोलन करतील- सीताराम येचुरी सरचिटणीस, माकप

ही तर सरकार पुरस्कृत दहशत आहे. कवी, मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे-मायावती अध्यक्षा, बसप

गंभीर गुन्हय़ांमध्ये सहभागी असलेल्या हिंदुत्ववादी सनातन संस्थेवरचे लक्ष हटविण्यासाठी ही कारवाई केली आहे-प्रकाश आंबेडकर

हल्ला होईल अशी भीती मोदींना वाटतेय. कधी कोणाला अटक होईल हे सांगू शकत नाही. आणीबाणीचा मार्ग मोकळा केला जातोय- लालूप्रसाद यादव अध्यक्ष, राजद

सर्वोच्च न्यायालयात काय झाले?
प्रसिद्ध विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्यासह अनेक वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मतभेद असणे हे लोकशाहीच्या ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’सारखे आहे. जर हा सेफ्टी व्हॉल्व्ह काढून टाकला तर स्फोट होईल, अशा शब्दांत न्यायालयाने यावेळी ताशेरे ओढले. सर्वोच्च न्यायालयाने तातडीने याचिकेवर सुनावणी घेतली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती  ए. एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. अटक केलेल्या पाच जणांना 6 सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवा. त्यांना अटक करू नका असे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर, अर्थतज्ञ प्रभात पटनायक आणि देवी जैन यांच्यासह पाच विचारवंतांनीही शहरी माओवाद्यांच्या अटकेविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांना नोटीस बजावली आहे.