
मुंबई महापालिकेच्या ‘एफ-दक्षिण’ विभागातील भोईवाडा स्मशानभूमीतील दोन्ही ‘विद्युतदाहिनी’चे ‘नैसर्गिक वायूदाहिनी’ (पीएनजी) मध्ये रूपांतर करण्यात येत असल्याने स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी सेवा एप्रिल 2022 पर्यंत बंद राहणार आहे. मात्र, स्मशानभूमीतील लाकडावरील पारंपरिक पद्धतीची चिता सेवा सुरू राहणार आहे.
भोईवाडय़ातील स्मशानभूमीत पूर्वी पारंपरिक पद्धतीनेच लाकडावर आधारित अंत्यसंस्कार होत होते. पर्यावरणपूरक सेवांचा विचार करून महानगरपालिकेने अंदाजे 15 वर्षापूर्वी तिथे दोन विद्युतदाहिन्या सुरू केल्या. अंत्यसंस्कार करण्यासाठी या विद्युतदाहिन्या सकाळपासून सुरू कराव्या लागतात. तसेच धुरांडय़ातून धूर थेट बाहेर पडतो तसेच विद्युतदाहिनीचे संचालन करणाऱया कर्मचाऱयांनाही काही प्रमाणात समस्यांचा सामना करावा लागतो. या सर्व अडथळय़ांचा महापालिकेने सखोल अभ्यास करून अधिक पर्यावरणस्नेही असलेली व नलिकांद्वारे उपलब्ध होणाऱया नैसर्गिक वायू (पीएनजी) आधारित दाहिनीमध्ये या विद्युतदाहिन्यांचे रूपांतर करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पर्यावरणाचे रक्षण तर होईलच, सोबत ध्वनिप्रदूषण संपुष्टात येणार आहे.
40 लाखांची बचत होणार
वायूदाहिनीसाठी महानगर गॅसकडून गॅसचा पुरवठा होणार आहे. या नैसर्गिक वायूदाहिनीमुळे भोईवाडा स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीवर होणारा वार्षिक सुमारे 40 लाख रुपयांचा खर्च वाचणार आहे तसेच देखभालीचा खर्चही कमी होईल. विद्युतदाहिनीच्या तुलनेत वायूदाहिनी ही अधिक पर्यावरणस्नेही असणार आहे.





























































