‘मी घरात राहू शकत नाही, मी समाजाचा शत्रू आहे’ नियम तोडणाऱ्यांना पोलिसांनी शिकवला धडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊननंतरही लोकांना आपल्या घरातून बाहेर पडल्याशिवाय राहवत नाही. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीची साखळी तोडण्याची बाब ते गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. प्रशासनाने वारंवार आवाहन करूनही लोक घरातून बाहेर पडतच आहेत. अशा लोकांना मध्य प्रदेशातील मंदसौर पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

कोरोनामुळे मंदसौर जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन आहे. तरीही काही तरुण मुले घरातून बाहेर पडली होती. या मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पंतप्रधानांनीही राज्यांना निर्देश दिले आहेत की, जे लॉकडाऊनच्या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई करा. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली.

हातात पॉम्पलेट देऊन काढले फोटो

अशा प्रकारे नियम तोडणाऱ्या या तरुणांच्या हातात पोलिसांनी पॉम्पलेट दिले. या पॉम्पलेटवर ‘मी समाजाचा शत्रू आहे, मी घरी राहणार नाही’ असा मजकूर लिहिला आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या हातात हे पॉम्पलेट देऊन पोलिसांनी त्यांचे फोटो काढले आणि सोशल माध्यमाद्वारे व्हायरल केले. मात्र, माध्यमांनी त्यांचे चेहरे दाखवलेले नाहीत. मंदसौरचे पोलीस अधीक्षक हितेश चौधरी म्हणाले, हे लोक जिल्ह्यात लागू करण्यात आलेल्या कलम 144 चे उल्लंघन करीत होते. लोकांना घरात राहण्यासाठी हा सामाजिक प्रयोग करण्यात आला आहे. कारण त्यामुळे स्वतःहूनच लोक कोणताही दबाव न आणता घरातून बाहेर पडणार नाहीत. मात्र, लोक अशाच प्रकारे घराबाहेर पडत राहिले तर अडचणी आणखीनच वाढतील.

मध्य प्रदेशातील विविध जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्याचबरोबर काही संशयितांना आयसोलेट करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर परदेशातून आलेल्या लोकांनाही वेगळे ठेवण्यात आले आहे. कोरोनाचा सार्वत्रिक फैलाव होऊ नये, यासाठी 30 पेक्षा जास्त जिल्ह्यांना लॉकडाऊन करण्यात आले आहे.