
नगर शहरातील पर्यटन वाढावे, या दृष्टिकोनातून भुईकोट किल्ल्याच्या सुशोभीकरणाचा विषय हाती घेण्यात आला आहे. यासाठी 95 कोटी रुपयांचा नवीन आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली. यामध्ये लष्करासोबत पंधरा वर्षांचा करार केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर आदी यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, 2017 साली नगरच्या भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरण करण्याचा विषय हाती घेण्यात आला होता. त्यावेळी जो प्रस्ताव तयार करण्यात आलेला होता त्यातील पाच कोटी रुपये प्राप्त झाले होते व त्यातून काही कामे करण्यास सुरुवात झाली होती. मात्र, त्यानंतर ही कामे थांबली गेली, असे ते म्हणाले.
भुईकोट किल्ल्याचे सुशोभीकरण करण्याचा विषय आता हाती घेण्यात आला असून, तीन टप्प्यांमध्ये सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी नव्याने 95 कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाच्या पर्यटन विभागाकडे पाठवण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले. तीन टप्प्यांत होणाऱया कामात किल्ल्याभोवतीची तटबंदी दुरुस्त करणे तसेच आतील प्रलंबित कामे मार्गी लावणे तसेच तिसऱया टप्प्यांमध्ये सुशोभीकरणाची कामे हाती घेण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी म्हणाले.






























































