
सामना प्रतिनिधी, पारनेर
नगर पुणे महामार्गावर जातेगाव घाटामध्ये रुग्णवाहिकेने धडक दिल्याने चार वर्षाच्या बिबट्याचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जातेगाव घाट परिसरातील डोंगरदऱ्यांमध्ये बिबट्यांसह अनेक जंगली प्राण्यांचे वास्तव्य आहे. भक्ष्याच्या शोधात डोंगरातून महामार्गावर आलेला बिबट्या रस्ता ओलांडत असताना नगरकडे जाणाऱ्या रुग्णवाहिकेने त्यास धडक दिली व त्यात तो गंभीर जखमी झाला. धडक झाल्यानंतर रुग्णवाहिका तेथून निघून गेली. मात्र रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या बिबटयामुळे वाहतूक खोळंबली.
बिबटयास पाहण्यासाठी प्रवासी तसेच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. वाघुंड्याचे दादा शिंदे व इतरांनी त्यासंदर्भात सुपा पोलीस ठाण्यास माहिती दिल्यानंतर पोलिसांनी जखमी बिबट्यास वाहनातून पोलीस ठाण्यात नेले. दरम्यानच्या काळात वनपाल पल्लवी उंडे यांच्याशी संपर्क करण्यात आल्यानंतर स्वतः उंडे, वनरक्षक अंकराज जाधव, वनकर्मचारी बंडू गोरे, लिपीक सतिष उंडे यांनी सुपे पोलीस ठाण्यात जाऊन जखमी बिबट्यास ताब्यात घेतले. त्याच्यावर पारनेर येथील पशुचिकित्सालयात उपचारासाठी नेण्यात येत असतानाच तो गतप्राण झाला. मंगळवारी सकाळी वनविभागाच्या कार्यालयात मृत बिबटयाचे डॉ. गुंड यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर पारनेरच्या डोंगरामध्ये त्याचे दहन करण्यात आल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनिषा भिंगे यांनी सांगितले.


































































