चिनी गुंतवणूक असलेल्या ‘बिग बास्केट’ वर सायबर हल्ला, दोन कोटी हिंदुस्थानींची खासगी माहिती चोरली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चीनची गुंतवणूक असलेल्या ’बिग बास्केट’ या ऑनलाईन किराणा माल विकणाऱया कंपनीवर सायबर हल्ला झाला असून दोन कोटी हिंदुस्थानींची माहिती चोरीला गेली आहे. एवढेच नव्हे तर ही माहिती डार्पवेबवर 30 लाख रुपयांनी विकली जात असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.

‘बिग बास्केट’ चा डेटा लीक झाल्यानंतर बंगळुरूस्थित सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार दाखल झाली आहे. सायबर इंटेलिजन्स कंपनी असलेल्या ’सायबल’च्या रिसर्च टीमला नियमित वेब मॉनिटरींगमध्ये बिग बास्केटचा डेटा 40 हजार डॉलरला चोरीला विकला जात असल्याचे आढळले. या डेटाची फाईल सुमारे 15 जीबी असून त्यामध्ये दोन कोटी युजर्सची माहिती आहे.

पासवर्डही गेले चोरीला

सायबल इंकच्या ब्लॉगनुसार, चोरीला जी माहिती गेली आहे, त्यामध्ये ग्राहकांची नावे, ईमेल आयडी, पासवर्ड, पिन, मोबाईल क्रमांक, पत्ता, जन्मतारीख, आयपी अॅड्रेस यांचा समावेश आहे.  युजर जेव्हा लॉग इन करतात तेव्हा एसएमएसच्या माध्यमातून येणारा वन टाईम पासवर्ड (ओटीपी) देखील चोरीला गेला आहे. ही सर्व चोरी 30 ऑक्टोबर 2020 रोजी झाली आहे. याबाबत बिग बास्केटच्या व्यवस्थापकांना माहिती देण्यात आली आहे.