गडकरी म्हणतात… गुजरातच्या विजयाचे श्रेय मोदींचे, तर हिमाचलमधील पराभव नशीबाने झाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणूकीत गुजरातमध्ये भाजपला मोठा विजय मिळाला असला तरी हिमाचल प्रदेशमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याबाबात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, गुजरातमध्ये भाजपला मिळालेल्या विजयाचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. मात्र हिमाचल प्रदेशात झालेल्या पराभवाबाबत विचारले असता त्यांनी चक्क नशीबाला दोष दिला आहे. तेथे आमची सत्ता होती. त्यामुळे सरकारविरोधातील नाराजीमुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला असे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

गुजरातमध्ये सलग अडीच दशकांहून अधिक काळ सत्तेवर असलेल्या भाजपाने ऐतिहासिक विजय मिळवत काँग्रेसला भुईसपाट केले असून आम आदमी पक्षाला एक आकडी जागांवरच रोखले आहे. तर भाजपाने हिमाचलची सत्ता गमावली आहे. याबाबत नितीन गडकरी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. गुजरातमधील विजयावर बोलताना सत्तेत असताना चांगलं प्रशासन आणि विकासाशी जोडलेलं राजकारण करणं याकडे आमचं लक्ष असतं. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर विकासाला एक वेगळी दिशा दिली. देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर आम्ही हाच अजेंडा कायम ठेवला. विकासाची केलेली कामे लोकांना दिसली, त्यांनी अनुभवले. त्यामुळेच लोकांनी मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपच्या पदरात मोठा विजय टाकला असे गडकरी म्हणाले. दरम्यान हिमाचलमधील पराभवाबद्दल बोलताना आम्ही फार कमी मतांनी पराभूत झालो आहोत. अनेकदा लोकांची सरकारविरोधातील नाराजी असते, परिवर्तनाची इच्छा असते. त्यामुळेच नशीबाने आम्हाला तिथे साथ दिली नसल्याचे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.