भाजपची साथ सोडा, महाआघाडीत या!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली   

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यापुढे काँग्रेसने एक नवाच प्रस्ताव ठेवला आहे. त्यानुसार नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडण्याची तयारी दाखवली तर त्यांना महाआघाडीत सामील करून घेण्यावर विचार केला जाऊ शकतो. अलीकडेच झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या वेळी जदयु आणि भाजपकडून परस्परविरोधी वक्तव्ये समोर आली होती. नेमकी हीच वेळ साधून काँग्रेसने नितीशकुमार यांच्यापुढे ही ऑफर ठेवल्याने भाजप व जदयु या पक्षांदरम्यान फारसे काही आलबेल नसल्याचेच स्पष्ट झाले आहे.

बिहारमधील काँग्रेसचे प्रभारी शक्तिसिंह गोहिल यांनी रामविलास पासवान आणि उपेंद्र कुशवाहा यांचा उल्लेख करून म्हटले आहे की, केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार मागास व अतिमागास वर्गाच्या विरोधात असल्याची राज्यात लोकभावना आहे. त्यामुळे भाजपची साथ सोडण्याखेरीज या वर्गांपुढे दुसरा पर्याय उरलेला नाही. भाजपविरोधात राष्ट्रीय पातळीवर होणाऱया महाआघाडीचे नेतृत्व काँग्रेसकडे असेल असे स्पष्ट करून गोहिल म्ह्णाले की, सध्या नितीशकुमार भाजपच्या सोबत आहेत. त्यामागे त्यांची नेमकी काय अगतिकता आहे हे आम्हाला माहीत नाही. परंतु ही जोडी विजोड आहे. नितीशकुमार यांना महाआघाडीत घेणार काय या प्रश्नावर गोहिल यांनी सकारात्मक संकेत दिले.

पासवान, कुशवाह काय उत्तर देणार?
रामविलास पासवान आणि उपेंद्र कुशवाहा मागास जातींचे राजकारण करतात, पण उनामध्ये दलितांवर अत्याचार होतात आणि भाजपचा एक नेता दलितांना मारले पाहिजे असे म्हणतो. तरीही पंतप्रधान मोदी मात्र गप्प बसतात. हे का याचे उत्तर पासवान आणि कुशवाह यांना द्यावे लागेल.
नितीशकुमार यांना महाआघाडीत यायचे असेल तर या मुद्दय़ावर आम्ही आमच्या सहकारी पक्षांशी नक्कीच चर्चा करू. मागास जातींचे राजकारण करणाऱया एनडीएमधून बाहेर पडावेच लागेल. तसे केले नाही तर एनडीए तर बुडेलच पण सोबत या पक्षांनाही बुडवील.
-शक्तिसिंह गोहिल, काँग्रेस प्रभारी, बिहार