माध्यान्ह भोजनात पाल पडली, 35 मुलांना विषबाधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

बिहारच्या छपरा येथे माध्यान्ह भोजनामुळे 35 मुलं आजारी पडली आहेत. या भोजनात पाल पडलेली आढळली आहे. तेच अन्न सेवन केल्यामुळे मुलांची तब्येत बिघडल्याची माहिती मिळत आहे.

बिहारच्या छपरा जिल्ह्यातील डुंगरी टिकुरिया टोला या गावातील शाळेत माध्यान्ह भोजन देण्यात आलं. ते जेवल्यानंतर शाळेतील 35 मुलं आजारी पडली. जेवणात मेलेली पाल पडल्याचं वाढप्याच्या लक्षात आलं. ही पाल भातात पडली होती. पालीच्या शरीराचा अर्धा भाग भात वाढताना आढळला. उरलेला अर्धा भाग भातात शिजून विरघळला. शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्वरित रुग्णालयाला संपर्क साधून रुग्णवाहिका मागवून घेतल्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची सूचना दिली.

शाळेच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे माध्यान्ह भोजनाचं कंत्राट ज्या संस्थेला दिलं होतं, त्या संस्थेतून योग्य ते भोजन मिळत नसल्याची आणि त्याच्या दर्जाबाबतची तक्रार वारंवार करण्यात आली होती. तरीही त्यांनी अशा प्रकारचं भोजन पाठवलं होतं. सुदैवाने वेळीच शाळेच्या कर्मचाऱ्यांना लक्षात आल्याने त्यांनी ताबडतोब मुलांना उपचार मिळवून दिले. सुदैवाने विषबाधा झालेल्या 35 मुलांची प्रकृती सध्या स्थिर आहे, अशी माहिती मिळत आहे.