नितीश रिटायर होताहेत, तेजस्वीला बर्थ डे गिफ्ट मिळणार का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीतील 243 जागांचा फैसला उद्या (दि. 10) लागणार आहे. ही माझी शेवटची निवडणूक, असे मुख्यमंत्री नितिशकुमार प्रचारात म्हणाले होते. सर्वच एक्झिट पोलनी महागठबंधनला काwल दिला असून एनडीएला पिछाडीवर ठेवले आहे. त्यामुळे उद्या नितिशकुमार निवडणुकीच्या राजकारणातून रिटायर होतात की 31 वर्षीय तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्रीपदाचे बर्थ-डे गिफ्ट मिळते हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

बिहार विधानसभेची निवडणूक अनेक अर्थाने लक्षवेधी ठरली. कोरोना महामारीत ही निवडणूक झाली. तीन टप्प्यातच मतदान झाले. सुरुवातीला ‘एनडीए’चे पारडे जड वाटत असतानाच राजद अध्यक्ष तेजस्वी यादव यांनी निवडणूक प्रचार एकहाती ताब्यात घेतला. लालूप्रसाद यादव तुरुंगात असल्यामुळे तेजस्वी यांनी राजदच्या प्रचाराची धुरा सांभाळली. काँग्रेसबरोबर महागठबंधन बनवले. दुसरीकडे ‘एनडीए’तून चिराग पासवान बिहारपुरते बाहेर पडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री नितिशकुमार, केंद्रातील डझनभर मंत्री हे ‘एनडीए’साठी प्रचारात होते. तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला.

कोरोनाकाळात 2015 पेक्षा जास्त मतदान

कोरोना महामारी असतानाही बिहारमध्ये 57.05 टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे 2015 पेक्षा ही टक्केवारी जास्त आहे. 2015च्या विधानसभा निवडणुकीत 56.6 टक्के मतदान झाले होते.

2015 चा काैल काय होता?

  • 2015च्या निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांची राजद, नितिशकुमार यांच्या जदयू आणि काँग्रेसने एकत्र येऊन महागठबंधनची मोट बांधली होती. दणदणीत बहुमत मिळाले होते. राजद-80, जदयू-71 आणि काँग्रेसला 27 जागा मिळाल्या. नितिशकुमार पाचव्यांदा मुख्यमंत्री बनले. 12 जास्त जागा मिळवूनही लालूप्रसाद यांचे पुत्र तेजस्वी उपमुख्यमंत्री झाले होते.
  • 2015ला भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएला अवघ्या 58 जागा मिळाल्या. त्यात भाजपला 53, चिराग पासवान यांच्या लोजपाला 2, राष्ट्रीय लोकसमता पार्टी-2 आणि हिंदुस्थानी अवामी मोर्चाला एक जागा मिळाली होती.
  • 26 जुलै 2017ला महागठबंधनमधून नितिशकुमार बाहेर पडले आणि एनडीएत सामिल झाले. भाजपबरोबर आघाडी करून नितिशकुमार सहाव्यांदा मुख्यमंत्री झाले.

दुपारी काैल स्पष्ट होईल

  • 243 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सकाळी 8 वाजता सुरू होईल.
  • 38 जिह्यांत 55 मतमोजणी केंद्रांमध्ये ही मोजणी होणार आहे.
  • लोकांनी गर्दी करू नये. नियमांचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
  • दुपारी एकपर्यंत बिहारमध्ये सरकार कोणाचे? याचे चित्र स्पष्ट होईल.

एक्झिट पोलचा अंदाज खरा निघाला तर!

  • सर्व वृत्तवाहिन्यांनी एनडीएपेक्षा महागठबंधनला जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तविला आहे. इंडिया टुडे-ऑक्सिस, टुडे-चाणक्यने तर महागठबंधन तब्बल 179 ते 191 जागा मिळवून दोन तृतीयांश बहुमत मिळेल, असे म्हटले आहे.
  • बिहार विधानसभेच्या 243 जागा आहेत. बहुमतासाठी 122चे संख्याबळ हवे.
  • ‘एक्झिट पोल’चे अंदाज खरे ठरले, तर महागठबंधनचे सरकार येईल आणि तेजस्वी यादव हे देशातील सर्वात तरुण मुख्यमंत्री बनतील.
  • ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे भावनिक आवाहन नितिशकुमार यांनी शेवटच्या प्रचारसभेत केले होते. ‘एनडीए’चा पराभव झाल्यास नितिशकुमार खरोखरच निवडणुकीच्या राजकारणातून रिटायर होतात का? हे पाहावे लागेल.