
ऐन दिवाळीच्या सणात बिहारच्या गोपालगंजमध्ये दुर्घटना घडली आहे. गोपालगंजमध्ये विषारी दारू प्यायल्याने 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच काहीजणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. बिहारमध्ये दारुबंदी असतानाही ऐन दिवाळीच्या सणाला ही घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
विषारी दारू प्यायल्याने 10 जणांचा मृत्यू झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, डॉक्टर नवल किशोर चौधरी यांनी 9 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. विषारी दारूप्रकरणी पोलिसांनी तीन ठिकाणी छापे टाकून तीन जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांच्या घरात देशी दारूचे पाऊच सापडले आहेत.
विषारी दारू प्यायल्याने प्रकृती खालवलेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहीजणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. परिस्थिती लक्षात घेता अपत्कालीन वैद्यकीय पथक तैनात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बिहारच्या खनिजमंत्री जनकराम यांनी घटनास्थळी भेट दिली. जनतेने सावधानता बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच दारुपासून दूर राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे. बिहार सरकारची प्रतिमा डागाळण्यासाठी असे प्रकार घडत आहे. याची उच्चस्तरीय चौकशी होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे.
बिहारमध्ये 5 एप्रिल 2016 मध्ये दारुंबदी घोषित करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत विषारी दारुमुळे 123 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यात दारुबंदी असूनही अशा घटना घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे.




























































