
बिहारची राजधानी पाटणा येथे दोन गटांमध्ये भिंतीला रंग देण्याच्या क्षुल्लक कारणावरून राडे झाले आहेत. हे प्रकरण इतकं गंभीर झालं की यात एकाचा मृत्यू झाला असून सहाहून अधिक लोक जखमी झाले आहेत.
आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, पाटणा येथील मनेर तालुक्यात ब्रह्मचारी पोखर या गावात ही घटना घडली. येथील एका भिंतीला रंगरंगोटी करण्यावरून हा वाद सुरू झाला होता.
या भिंतीला रंग देण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद होते. ते वाद सोडवण्यासाठी पंचायत बोलवली गेली होती. पंचायतीसमोर हा निर्णय होणार होता. पण, यातील नंद कुमार राय यांच्या गटाच्या लोकांवर हल्ला करण्यासाठी त्यांच्या शेजारच्यांच्या गटातील लोक हजर झाले.
पंचायतीचं काम सुरू होण्यापूर्वीच दोन्ही गटांमध्ये वाद सुरू झाला. पाहता पाहता हा वाद इतका वाढला की, दोन्ही गटांनी एकमेकांशी लाठ्या काठ्यांनी हाणामारी करायला सुरुवात केली.
या वादात जखमी झालेल्या नंदकुमार राय याला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात येत होतं. मात्र, वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी गोंधळ घालायला सुरुवात केली.
कुटुंबीय आणि नातेवाईकांनी ग्रामस्थांसह राष्ट्रीय महामार्गावर नंदकुमार याचा मृतदेह ठेवला आणि जोरदार गोंधळ घातला, जाळपोळही केली. अखेर पोलिसांनी मध्ये पडून प्रकरण मिटवायचा प्रयत्न केला. नंदकुमार याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आणि जखमी झालेल्या सहाहून अधिक लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.




























































