कचऱ्यापासून इंधन, बायोगॅस आणि खत! स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी पालिकेचे पुढचे पाऊल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वच्छ, सुंदर मुंबईसाठी पालिकेने अनेक उपाययोजना करण्यास सुरुवात केल्यामुळे शहराचे रूपडे पालटत आहे. यामध्ये आता कचऱ्यापासून बायोगॅस, खत आणि इंधन तयार करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविला जाणार आहे. मुंबईतील चार कचरा हस्तांतरण केंद्रांवर यासाठी अत्याधुनिक प्रकल्प उभारले जाणार आहेत. यामुळे कचऱ्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न सुटणार असून पुनर्वापरामुळे टाकाऊ कचऱ्याचा सदुपयोगही होणार आहे. घन कचरा व्यवस्थापन विभाग कार्यकारी अभियंता आणि सहायक आयुक्त अनंत भागवतकर यांनी ही माहिती दिली.

मुंबई महानगरपालिकेने 2 ऑक्टोबर 2017 पासून सोसायटय़ांना कचऱ्याचे व्यवस्थापन करणे बंधनकारक केले आहे. यामध्ये 20 हजार चौरस मीटरपेक्षा मोठय़ा गृहनिर्माण सोसायटय़ा आणि 100 किलोंपेक्षा जास्त कचरा निर्माण होणाऱ्या इमारती-आस्थापनांना ओल्या कचऱ्याच्या विल्हेवाटीचे व्यवस्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कचरा व्यवस्थापनामुळे दोन वर्षांपूर्वी दररोजचे सात ते साडेसात हजार मेट्रिक टनांपर्यंत असणारे कचऱ्याचे प्रमाण आता चांगलेच कमी झाले आहे.

कचरा केंद्र बनणार ‘आदर्श कचरा केंद्र’!

कोरोनामुळे मुंबईत लागू असलेल्या कडक निर्बंधांमुळे कचरा निर्माण होण्याचे सहा हजार मेट्रिक टनांपर्यंत असणारे प्रमाण निर्बंध काळात साडेपाच हजार मेट्रिक टनांपर्यंत कमी आले आहे.

मुंबईतील सहा हजार मेट्रिक टनांच्या कचऱ्यापैकी सुमारे दोन हजार मेट्रिक टन कचरा हा सहा ठिकाणी असणाऱ्या कचरा हस्तांतरण पेंद्रांवर  छोटय़ा वाहनांमधून जमा केला जातो. यानंतर मोठय़ा वाहनांमधून डंपिंग ग्राऊंडवर नेऊन विल्हेवाट लावली जाते.

मात्र वर्सोवा, गोराई, कुर्ला आणि महालक्ष्मी येथे असणाऱ्या कचरा हस्तांतरण पेंद्रांच्या ठिकाणी जमा होणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते. शिवाय रोगराई पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे या ठिकाणी कचरा पुनर्प्रक्रिया करणारी ‘आदर्श कचरा हस्तांतरण केंद्र’ बनवण्यात येणार आहे.

असे होणार काम

कचरा हस्तांतरण पेंद्रावर येणाऱ्या कचऱ्याचे सुका कचरा, ओला कचरा असे विलगीकरण होईल. यानंतर प्लॅस्टिकच्या कचऱ्यापासून पायरोलेसिस तंत्रज्ञानाने प्रक्रिया करून इंधन ऑइल तयार होईल. शिवाय टाइल्स, पेव्हर ब्लॉक, विटा अशा वस्तू बनवल्या जातील. ओल्या कचऱ्यापासून खत आणि बायोगॅस प्रकल्प उभारले जातील. ही सर्व कामे कचरा हस्तांतरण केंद्र बंदिस्त करून केली जाणार असल्यामुळे परिसरातील दुर्गंधी, रोगराईचा धोका टळेल. शहाळ्यापासून डोअर मॅट, दोऱ्या, कोकोपिट अशा अनेक वस्तू बनवल्या जाणार आहेत.