नगरसेवक फुटण्याच्या धसक्यानेच भाजपचे शिवसेनेवर बेछूट आरोप!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या पालिकेतील वरिष्ठ नेत्यांच्या मनमानी कार्यपद्धतीमुळे बीजेपीचे अनेक नगरसेवक अक्षरशः कंटाळले आहेत. त्यामुळे आपले नगरसेवक फुटण्याच्या धसक्यानेच शिवसेनेवर बेछूट आरोप करून राजकारणाच्या माध्यमातून त्यांचे लक्ष विचलित करण्याचा खटाटोप सुरू असल्याचा घणाघात आज स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे. अनेक नगरसेवक शिवसेना नेत्यांच्या संपर्कात असून डिसेंबरमध्ये भाजपला खिंडार पडेल, असा दावाही जाधव यांनी केला.

मुंबईतील सफाई कामगारांना ‘आश्रय’ योजनेतून घर देण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात 300 ते 600 चौरस फुटांची हजारो घरे बांधली जाणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजूरही झाले आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीत हे प्रस्ताव मांडले जात असताना भाजपचे नगरसेवक-नेते मूग गिळून गप्प का बसले होते, असा सवालही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केला आहे. भाजपने ‘आश्रय’ योजनेत 1844 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा केलेला आरोप सिद्ध करून दाखवावा, असे आव्हानही शिवसेनेने दिले आहे. आपले नगरसेवक फुटू नयेत यासाठी त्यांना वरिष्ठ नेत्यांकडून धमकावले जात असल्याचेही जाधव यांनी सांगितले.

शिवसेनेमुळे सफाई कामगारांना 4006 घरे मिळणार

सफाई कामगारांना कामाच्या ठिकाणापासून जवळ घर मिळावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून शिवसेनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. अखेर हा प्रश्न आता मार्गी लागला आहे. यामध्ये मुंबई शहरात 1121, पश्चिम उपनगरात 1499 आणि पूर्व उपनगरात 1386 अशी एकूण 4006 घरे बांधली जाणार आहेत. याबाबतचे प्रस्ताव मंजूर झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेनेच सफाई कामगारांना न्याय दिला असल्याचेही यशवंत जाधव म्हणाले.