कोस्टल रोडचा वाढीव शुल्क कंत्राटदार भरणार, वेळ वाचणार तरीही भाजपचा थयथयाट!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईला वेगवान बनवणाऱया पालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामातील अंतर्गत बदलामुळे सल्लागार शुल्कात 7.29 कोटींची वाढ होणार असली तरी यातील वाढीव खर्च कंत्राटदार करणार असून अंतर्गत बदलांमुळे एकूण खर्चात 6.84 कोटींची आणि कामाच्या कालावधीत तीन महिन्यांची बचत होणार आहे. असे असताना भाजप नगरसेवकांनी आज स्थायी समितीच्या बैठकीत नाहक गोंधळ घालत कोस्टल रोड कामात साडेसहा कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला.

‘कोस्टल रोड’च्या कामात प्रियदर्शिनी पार्क ते बडोदा पॅलेसपर्यंतचे काम मेसर्स लार्सन ऍण्ड टुब्रो लिमिटेड कंपनीला तर वांद्रे ते वरळी भागाचे काम मेसर्स एच.सी.सी.- एच. डी. सी. या कंत्राटदारांना संयुक्त भागीदारीत कंत्राटकाम देण्यात आले. कोस्टल रोडच्या एकूण कामाला तब्बल 12 हजार 721 कोटी खर्च करण्यात येणार आहे. या कामासाठी प्रकल्प सल्लागाराबरोबरच मे. एईकॉम एशिया कंपनी याची साधारण सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मात्र काम सुरू असताना साधारण सल्लागार क आयआयटी पकई यांच्या तज्ञांनी कोस्टल रोड प्रकल्पात पुलाच्या कामासाठी व आंतरबदलासाठी अनेक स्तंभ पायाऐवजी एकल स्तंभ पाया या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शिफारस केली. त्यामुळे कंत्राट खर्चात एकूण 11 कोटी 94 लाख रुपयांची बचत होणार आहे. मात्र या कंत्राट कामातील बदलामुळे प्रकल्प सल्लागाराने आपल्या 5 कोटी 91 लाख रुपयांची शुल्कवाढ मागितली होती. त्यास ऑगस्ट 2021 रोजी मान्यता देण्यात आली होती. आता पुन्हा एकदा तशाच प्रकारचा प्रस्ताव स्थायी समितीला मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

आरोपांतही एकवाक्यता नाही!

कोस्टल रोडच्या कामावरून भाजपकडून करण्यात आलेले आरोप बिनबुडाचे असल्याचे सिद्ध झाल्याचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले. एक नेता म्हणतो सोळाशे कोटींचा घोटाळा, नगरसेवक स्थायी समितीत आरोप करतात साडेसहा कोटींचा घोटाळा आणि सभागृहाबाहेर येऊन घोषणा देतात की साडेआठ कोटींचा घोटाळा. त्यामुळे भाजपने किमान आरोप काय करायचे हे एकदा निश्चित तरी करावे, असा टोलाही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी लगावला. दरम्यान, भाजपने या प्रस्तावाला विरोध करीत उपसूचना मांडूनही प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला.