
काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडणुकीत उभा राहतो त्या ठिकाणी भाजपला मदत करण्यासाठी ‘एमआयएम’चा उमेदवार उभा केला जातो. भाजपच ‘एमआयएम’च्या उमेदवारांना पैसा पुरवतो, असा गंभीर आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी केला. भाजप-एमआयएम आणि बीआरएस हे सर्व जण एकच आहेत, असे सांगत तिन्ही पक्षांवर हल्लाबोल चढवला.
राहुल गांधी यांनी बुधवारी कलवाकुर्थी या ठिकाणी आयोजित केलेल्या प्रचार सभेला हजेरी लावत सत्ताधारी भारत राष्ट्र समिती, भाजप आणि असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम या पक्षांवर टीकेची झोड उठवली. हे तिन्ही पक्ष काँग्रेसविरोधी असून काँग्रेस या पक्षाला चारीमुंडय़ा चीत करेल, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.


























































