राष्ट्रवादी आता टग्यांची पार्टी झालीय, मोहन जगताप यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बीड

‘काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादी सामान्य जनतेची पार्टी होती, मात्र आता काम संपले की ‘हम आपके है कौन’ ही विचारधारा रुजली गेली आहे. आता राष्ट्रवादी ही टग्यांची पार्टी झाली आहे,’ असा घणाघात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेले माजलगावचे नेते मोहन जगताप यांनी केला.

डॉ. प्रीतम मुंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जाहीर सभेचे आयोजन केले होते. या सभेमध्ये बोलताना मोहनराव जगताप यांनी राष्ट्रवादी वर हल्लाबोल केला. ते म्हणाले, राष्ट्रवादीवर आम्ही प्रेम केले, मात्र राष्ट्रवादीने काय दिले. काम आहे तो पर्यंत माणसाला सांभाळले जाते, काम संपले की ‘हम आपके है कौन’ ही विचारधारा राष्ट्रवादीमध्ये रुजली आहे. सामान्यांची ही पार्टी आता दोन चार टग्यांची पार्टी झाली आहे. यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पालकमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, महादेव जानकर, आमदार सुरेश धस, आर टी देशमुख, संगीताताई ठोबरे, लक्ष्मण पवार, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे आदी उपस्थित होते.