भाजपकडून सध्या सत्तेचा गैरवापर सुरू, शरद पवार यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ncp president sharad-pawar

सामना प्रतिनिधी । मुंबई

भाजपकडून सध्या सत्तेचा गैरवापर सुरू आहे. पण त्याला उत्तर कसे द्यायचे हे आम्हाला ठाऊक आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पक्षांतरावर शरद पवार यांनी प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, माझ्या दृष्टीने सध्या काही विशेष घडत नाही. पक्षांतराबाबत मला थोडीही चिंता वाटत नाही. पक्षांतर केलेल्या लोकांना केंद्र व राज्यात सत्तेशिवाय आपल्याला निवडून येणे शक्य नाही अशी भीती अनेकांच्या मनात होती असा अस्वस्थ वर्ग अस्थिर झाला आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे ते सत्तेचा वापर करून अनेकांना ओढून घेत आहेत अशा शब्दांत पवार यांनी भाजपवर टीका केली.

ईडी व आयकर खात्याची मदत घेतली जात असल्याचे काही लोकांनी माझ्याशी बोलताना सांगितले, असे सांगून पवार म्हणाले की, त्याचे उदाहरण कोल्हापूरमध्ये दिसले. ते येत नाही म्हणताच काय घडले हे सर्वांच्या समोर आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर सुरू आहे हे स्पष्ट होते असेही पवार म्हणाले.

यापूर्वीची आठवण सांगताना ते म्हणाले की, 1980 मध्ये आमचे 60 लोक निवडून आले होते. मी तेव्हा पंधरा दिवस परदेशात होतो. त्यादरम्यान आमचे सर्व लोक फोडले. मी देशात परतलो तेव्हा आमच्याकडे फक्त सहा आमदार शिल्लक होते. पण तेव्हाही मला चिंता नव्हती. कारण त्यानंतरच्या निवडणुकीत जे आम्हाला सोडून गेले ते पराभूत झाले आणि आमचे 60 आमदार निवडून आले. त्यामुळे हे सर्व आम्ही अनुभवले आहे. त्याला कसे उत्तर द्यायचे हे आम्हाला ठाऊक आहे आणि पुन्हा पक्ष कसा उभा करायचा याची आम्हाला काळजी आहे, असे पवार म्हणाले.