कोविड काळात कर्नाटकात 40 हजार कोटींचा घोटाळा, भाजपच्याच आमदाराने केला गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोविड काळात कर्नाटकात भाजपचे सरकार होते. या काळात भाजपने कोट्यवधींचा घोटाळा केला असल्याचा आरोप त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने केला आहे. हा घोटाळा 40 हजार कोटी रुपयांचा असल्याचा आरोप भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी केला आहे. यत्नाळ यांनी आपल्याला पक्षातून काढले तर हा घोटाळा बाहेर काढू अशी पक्षाला धमकी दिली आहे. कोविड काळात कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला होता असे आरोप यापूर्वीही करण्यात आले होते. यत्नाळ यांच्या धमकीमुळे हे भाजप सरकार हे 40 टक्के कमिशन सरकार असल्याच्या आरोपांना बळकटी मिळाली असल्याचे कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांनी म्हटले आहे.

यत्नाळ यांनी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते येडीयुरप्पा यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबियांवर टीका केली आहे. येडीयुरप्पा यांचा दुसरा मुलगा बी वाय विजयेंद्र यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनविण्यात आले आहे. येडीयुरप्पा कुटुंबाच्या घराणेशाहीवर यत्नाळ संतापले आहेत. यातूनच त्यांनी आरोप केला आहे. यत्नाळ यांनी म्हटले आहे की येडीयुरप्पा सरकारने 45 रुपयांचा मास्क 485 रुपयांना खरेदी केला होता. बंगळुरूत 10 हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यात आले होते. यातील खाटा भाड्याने घेण्यात आल्या होत्या. या खाटा विकत घेतल्या असत्या तर भाड्याच्या किंमतीत 2-3 खाटा विकत घेता येऊ शकल्या असत्या. खाटांचे भाडे 20 हजार रुपये होते. याच दराने सलाईन स्टँड असलेल्या दोन खाटा विकत घेता येऊ शकल्या असत्या. आपण करत असलेल्या आरोपांसंदर्भातील कागज लोकलेखा समितीकडे उपलब्ध असल्याचे यत्नाळ यांनी म्हटले आहे.

यत्नाळ यांनी पुरावे हवे असल्यास पत्रकारांनी भाजपची सत्ता असताना कर्नाटकचे कायदा व संसदीय कामकाज मंत्री असलेल्या एच.के.पाटील यांच्याशी बोला असे सांगितले. विजयपुरा मतदारसंघाचे आमदार असलेल्या यत्नाळ यांनी सांगितले की एच.के.पाटील यांना लोकलेखा समितीचे अध्यक्ष बनण्याची संधी आली होती, मात्र अध्यक्ष झाल्यास आपण सगळ्या गोष्टी सार्वजनिक करू असा पवित्रा त्यांनी घेतला होता ज्यामुळे त्यांना हे अध्यक्षपद देण्यात आले नाही असा आरोप यत्नाळ यांनी केला आहे.

यत्नाळ यांनी म्हटले आहे की, भाजप सरकारच्या काळात प्रत्येक रुग्णामागे 8 ते 10 लाख रुपयांचे बिल दाखवण्यात आले. आपल्याला कोरोनाची लागण झाली होती तेव्हा मला खासगी सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले होते. तेव्हा माझे बिल 5.8 लाख रुपये झाले होते. सरकारकडून वैद्यकीय मदत मिळत असूनही मी माझ्या खिशातून हे पैसे भरले असे यत्नाळ यांनी म्हटले. रुग्णांची बिले फुगवून या पैशांचा अपहार केल्याचा आरोप यत्नाळ यांनी केला आहे.