गोपाळ शेट्टी राजीनाम्याच्या तयारीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

ख्रिश्चनांनी स्वातंत्र्यलढय़ात भाग घेतला नव्हता असे विधान केल्याने भाजपा नेत्यांनी खासदार गोपाळ शेट्टी यांचे चांगलेच कान उपटले. त्यामुळे पदापेक्षा व्यक्तिस्वातंत्र्य महत्त्वाचे असे सांगत शेट्टींनी राजीनामा देण्याची तयारी केली आहे. ख्रिश्चनांबद्दल केलेल्या विधानावर आपण ठाम असल्याचेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

भाजपाचे ज्येष्ठ खासदार असलेले गोपाळ शेट्टी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात हे वादग्रस्त विधान केले होते. सोशल मीडियावर ते व्हायरल झाल्याने भाजपा नेत्यांचे धाबे दणाणले.२०१९ च्या निवडणुकांची तयारी भाजपा करत असताना शेट्टी यांच्या या विधानामुळे भाजपाला ख्रिश्चन समाजाची मते मिळणे कठीण होऊ शकते याची जाणीव झाल्याने भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी शेट्टी यांना त्यांचे विधान मागे घेण्यास सांगितले होते. तसेच ते शेट्टी यांचे वैयक्तिक मत असून आम्ही ख्रिश्चन समाजाचा आदर करतो असे सांगत सारवासारवही केली होती. शेट्टी यांच्या या विधानामुळे दुखावलेल्या ख्रिश्चन समाजातील दोन नागरिकांनी शेट्टी यांच्या विरोधात पोलीस तक्रारही केली आहे.