भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह साथीदारांवर गुन्हा, बिल्डरच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाईंदरमधील भाजपचे वादग्रस्त माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर बिल्डरच्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांचे कट्टर समर्थक व स्थायी समितीचे माजी सभापती संजय थरथरे यांच्यासह 35 ते 40 जणांवरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणामुळे बिल्डरलॉबीमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

भाईंदर पश्चिम येथील तोदीकाडी येथे मेट्रोचे काम सुरू असून त्या ठिकाणी काही जागा पालिकेच्या 45 मीटर रुंद डीपी रस्त्यात गेल्या आहेत.जमीनमालक व बिल्डर श्यामसुंदर अग्रकाल यांच्या जागेत घुसखोरी करीत त्यावर कब्जा करण्याचा नरेंद्र मेहता यांचा डाव होता, असा आरोप करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षकांची धाव

मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास नरेंद्र मेहता, प्रशांत केळुसकर आणि त्यांचे साथीदार जमा झाले व त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. स्वतः पोलीस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. मेहता यांनी जी काही रक्कम ठरवली होती ती दिली नाही म्हणून करार रद्द झाला आहे. तरीही बेकायदा माझ्या मालकीच्या जागेत घुसून कब्जा करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप बिल्डर अग्रवाल यांनी केला. त्यांच्या तक्रारीनंतर नरेंद्र मेहता व त्यांच्या साथीदारांवर नुन्हा दाखल करण्यात आला.