भाजपने पाच कोटी रुपये दिले, काँग्रेसच्या माजी आमदाराची स्टिंग ऑपरेशनमध्ये कबुली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमध्ये 8 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी प्रचार थांबला आहे. 3 नोव्हेंबर रोजी या ठिकाणी मतदान होणार आहे. त्याआधीच एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

भाजपने पक्षात येण्यासाठी 5 कोटी रुपये दिले असे एका काँग्रेसच्या माजी आमदाराने म्हटले आहे. काँग्रेसने या घटनेचे स्टिंग ऑपरेशन केले असून त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काँग्रेसने आपल्या सोशल मीडियावर स्टिंग ऑपरेशनचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वी राजकारण तापले आहे.

काँग्रेसचे माजी आमदार सोमाभाई गांडाभाई पटेल यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात पटेल म्हणत आहेत की भाजपने पैसे दिल्यानंतर आपण राजीनामा दिला आहे. कोणीही आमदार असेच राजीनामा देईल का? सोमाभाई पटेल म्हणतात की काही आमदारांना 10 कोटी रुपयेही दिले आहेत. काहींना पैसे दिले आहेत, काहींना निवडणुकीचे तिकिट दिले आहे असेही सोमाभाई म्हणाले आहेत.


गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित चावडा यांनी हा व्हिडीओ शेअर करत म्हटले आहे की भाजपने भ्रष्टाचार करून घोडेबाजार केला आहे. या व्हिडीओमुळे एक गोष्ट स्पष्ट झाली की भाजप कशा प्रकारे आमदार विकत घेत आहेत.

गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी हे दावे फेटाळून लावले आहे. जेव्हा काँग्रेस आमदारांनी राजीनामे दिले तेव्हा आपण प्रदेशाध्यक्ष नव्हतो, तर आपले नाव या व्हिडीओत कसे आले? या स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून कोली समाजाला बदनाम केले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.