आरक्षणप्रकरणी कागदी घोडे नाचविण्याचा भाजपचा खेळ; सुप्रिया सुळे यांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षणासाठी मराठा आंदोलकांनी दिलेली मुदत 24 तारखेला संपत असल्याने आता हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सर्वच समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आणि संरक्षणासाठी एकवटले आहेत. मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला आहे. धनगर समाजही एसटी प्रवर्गात घेण्यासाठी आग्रही आहे. मराठा समाजाला ओबीसी कोटामध्ये आरक्षण देऊ नका, अशी ओबीसी समाजाची मागणी आहे. त्यामुळेआरक्षणाच्या प्रश्नांचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. त्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असतानाही, केवळ भाजपने कागदी घोडे नाचवण्याचा खेळ चालवल्याचा हल्लाबोल सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपत आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढची भूमिका जाहीर केली. 25 ऑक्टोबरपासून ते पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहेत. सरकारने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण देण्याची मागणी सकल मराठा समाज आणि जरांगे पाटील यांच्यावतीने करण्यात येत आहे. त्यातच, बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मराठा समाज बांधवांनी घेराव घातला होता. यावेळी, अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली. आता, यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर जनतेची दिशाभूल केली आहे. केंद्र आणि राज्यात बहुमतातील सरकार असूनही आरक्षणाबाबत कोणताही ठाम निर्णय हे सरकार घेऊ शकले नाही. मराठवाड्यातील तीन मराठा तरुणांनी तर जत तालुक्यात धनगर समाजातील एका तरुणाने या पंधरवड्यात याच नैराश्यातून आत्महत्या केल्या. भाजपने शासकीय नोकरभरतीचा खेळखंडोबा केला आहे. आरक्षणाच्या बाबतीत कागदी घोडे नाचविण्याचा खेळ चालविला आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

भाजपचे नेते महाराष्ट्रात एक आणि केंद्रात वेगळीच भूमिका घेतात. यांच्या आरक्षणाच्या कोणत्याही भूमिकेत एकवाक्यता नाही. परिणामी मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम आदी सर्व समुदायांचे आरक्षणाचे विषय अडकून पडले आहेत. या मुद्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने संसदेत वारंवार भूमिका मांडली आहे. मागे काही राज्यांतील विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर तेथील आरक्षणाच्या प्रश्नावर तेथील भाजपाच्या खासदारांनी केंद्रात पाठपुरावा करुन, सरकारवर दबाव आणून याबाबत लोकसभेत विधेयक आणून ते मंजूर करुन घेतले. पण महाराष्ट्रातील भाजपच्या खासदारांना हे जमले नाही कारण त्यांच्या भूमिका दुटप्पी आहेत. आम्ही वारंवार या सर्व आरक्षणाच्या बाबतीत एक विधेयक आणून ते मंजूर करुन घ्या अशी मांडणी करीत आहोत पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आजही शासनाने आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे आणि वरील सर्व समाजांना आरक्षण देण्याबाबतचे विधेयक मांडावे, आम्ही त्याचे समर्थन करु, असेही त्या म्हणाल्या.