
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले आहेत की, ‘हे लोक हिंदू नाहीत, ते फक्त हिंदू धर्माचा वापर करतात.’ अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी असा दावा केला आहे की, ‘आरएसएस आणि भाजपचे लोक ‘महिला शक्ती’ दडपून भीतीचे वातावरण निर्माण करत आहेत.’
नोटाबंदी आणि जीएसटीचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, नरेंद्र मोदी सरकारने ‘लक्ष्मी शक्ती’ आणि ‘दुर्गा शक्ती’ वर हल्ला केला आहे. ते (आरएसएस आणि भाजप) स्वतःला हिंदू पक्ष म्हणवतात आणि लक्ष्मी आणि मा दुर्गावर हल्ला करतात. मग ते म्हणतात की ते हिंदू आहेत. हे लोक खोटे हिंदू आहेत. हे लोक हिंदू नाहीत. ते हिंदू धर्माचा वापर करतात, असा आरोप राहुल यांनी केला आहे.
राहुल गांधी म्हणाले, ‘गेल्या 100-200 वर्षांत कोणत्याही एका व्यक्तीने सर्वोत्तम प्रकारे हिंदू धर्म समजून घेत त्याचे आचरण केले आहे तर ते महात्मा गांधी आहेत. हे आम्हीही मानतो आणि भाजप, आरएसएसचे लोकही मानतात. महात्मा गांधींनी शक्य तितक्या चांगल्या प्रकारे अहिंसा जगली. हिंदू धर्माचा पाया अहिंसा आहे. असे असूनही महात्मा गांधींना आरएसएसच्या विचारसरणीने का गोळ्या घातल्या? तुम्हाला याचा विचार करावा लागेल.’



























































