सौ चुहे खाके बिल्ली चली हज,भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, श्रीनगर

जम्मू-कश्मीरात रोज होणारे दहशतवादी हल्ले, फुटीरवाद्यांची दगडफेक, देशद्रोही नारेबाजी होत असताना पीडीपीबरोबर सत्ता भोगणाऱया भाजपला आता जाग आली आहे. पीडीपी सरकारमधून बाहेर पडण्याची घोषणा आज भाजपने केली. सवातीन वर्षांत अनेक जवान शहीद झाले तेव्हा भाजपने सत्ता सोडली नाही. आता २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतला आहे. भाजपची ही कृती म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज’ अशी प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे. दरम्यान, राज्यपाल एन.एन. वोरा यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राज्यपाल राजवटीची शिफारस केली आहे. कोणत्याही क्षणी ही राजवट लागू होईल.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज जम्मु-काश्मिरातील भाजपचे मंत्री आणि प्रमुख पदाधिकाऱयांची नवी दिल्लीत बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत भाजपचे सरचिटणीस आणि जम्मु-काश्मिरचे भाजप प्रभारी राम माधव यांनी पीडीपी बरोबरची युती संपुष्ठात येत असून, मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या सरकारमधून भाजप बाहेर पडत आहे, अशी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

रमजानमध्ये हल्ले वाढल्याचा अखेर साक्षात्कार

रमजान महिन्यात केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने  एकतर्फी शस्त्र्ासंधी लागून केली होती. याची मोठी किंमत चुकवावी लागली. रमजान महिन्यात काश्मिर खोऱयात तब्बल २६७ टक्क्यांनी दहशतवादी हल्ले वाढले. ६६ दहशतवादी हल्ले झाले. त्यात जाँबाज शहीद जवान औरंगजेब यांची अपहरण करून निर्घृण हत्या केली होती. तसेच २२ जवान शहीद झाले. १९ नागरिकांचा मृत्यू झाला. आज पत्रकार परिषदेत रमजानमधील एकतर्फी शस्त्र्ासंधी फसल्याची कबुली राम माधव यांनी दिली. शस्त्र्ासंधीचा चांगला परिणाम राज्यात दिसून येईल असे वाटले होते. पण दहशतवादी आणि हुरियत कॉन्फरन्सच्या कारवाया सुरुच राहिल्या असे माधव म्हणाले.

भाजपच्या निर्णयाचे आश्चर्य वाटले नाही पण ‘टायमिंग’विषयी थोडे आश्चर्य वाटले. गेल्या तीन वर्षात काश्मिर खोऱयातील परिस्थिती फारच भिषण झाली आहे. त्यामुळे सत्तेत असलेला भाजप जबाबदारीपासून पळू शकत नाही. राज्यपालांची भेट घेऊन राज्यात काहीकाळ राज्यपाल राजवट लागू करावी असे मी सांगितले. पण लवकरात लवकर विधानसभा निवडणुका घेतल्या पाहिजेत- ओमर अब्दुल्ला, अध्यक्ष, नॅशनल कॉन्फरन्स

भाजप-पीडीपीच्या संधीसाधू युतीने जम्मु-काश्मिरात अक्षरशः आग लावली आहे. अनेक शूर जवान शहीद झाले. निष्पाप नागरिकांचा बळी गेला. केंदाने राष्ट्रपती राजवट लागू केली तर जम्मु-काश्मिरचे आणखी नुकसान होईल. घमेंड आणि द्वेषाचे राजकारण नेहमीच अपयक्षी ठरते हे भाजपने लक्षात ठेवावे.-राहुल गांधी, अध्यक्ष, काँग्रेस

पीडीपी-भाजप युतीने जम्मु-काश्मिरला बर्बाद केले आहे. सामाजिक, आर्थिकदृष्टय़ा फार मोठी किंमत राज्याला चुकवावी लागली. पीडीपीला पाठिंबा देण्याची चूक काँग्रेस करणार नाही.-गुलाम नबी आझाद,राज्यसभेतील विरोध पक्षनेते

जम्मु-कश्मिरला बर्बाद केल्यानंतर आता भाजपने पीडीपीबरोबरची युती तोडली आहे. भाजपच्या निर्णयामागे फक्त राजकारण आहे. नोटाबंदीमुळे दहशतवाद थांबला का? याचे उत्तर भाजप देऊ शकते का?-अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री, दिल्ली

कोणत्याही क्षणी राज्यपाल राजवट

पीडीपी सरकारमधून बाहेर पडताना भाजपने जम्मू-कश्मिरात राज्यपाल राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. तसेच मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी नॅशनल कॉन्फरन्स किंवा काँग्रेसचा पाठिंबा घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनीही राज्यपालांची भेट घेऊन पीडीपीला पाठिंबा देणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे जम्मू-कश्मिरात राज्यपाल राजवट अटळ आहे. राज्यपाल वोरा यांनी रात्री उशिरा केंद्र सरकारकडे अहवाल पाठविला तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे राज्यपाल राजवटीची शिफारस केली आहे. राष्ट्रपती सध्या विदेश दौऱयावर आहेत. केंद्र गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. कोणत्याही क्षणी जम्मु-कश्मिरात राज्यपाल राजवट लागू केली जाणार आहे.  घटनेने जम्मु-कश्मिरला सेक्शन ९२ नुसार येथे राज्यपाल राजवट लागू करण्याचे विशेष अधिकार दिले आहेत.

राज्यपालांनीच फोन करून मुख्यमंत्री मुफ्तींना सांगितले, भाजपने पाठिंबा काढला

भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी दुपारी दोन वाजता नवी दिल्लीत पीडीपी सरकारमधून बाहेर पडल्याची घोषणा केली. मात्र, या घोषणेपूर्वीच काही मिनिटे आधी राज्यपाल एन.एन. वोरा यांनीच मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना फोन करून भाजपने पाठिंबा काढल्याची माहिती दिली. हे ऐकताच मेहबुबा मुफ्ती यांना धक्का बसला. त्यांनी टीव्हीवर लाईव्ह पत्रकार परिषद पाहिली आणि राजभवन गाठत आपला राजीनामा राज्यपालांकडे दिला. दरम्यान, या घटनाक्रमाची जोरदार चर्चा सुरु आहे. राज्यपालांनीच मुख्यमंत्र्यांना सहकारी पक्षाने पाठिंबा काढल्याची कल्पना देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

माझा अजेंडा पूर्ण झाला-मेहबूबा मुफ्ती

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला भेट दिली
  • ३७०व्या कलमाला कोणतीही छेडछाड होऊ दिली नाही
  • दगडफेकीचे ११ हजार तरुणांवर असलेले खटले मागे घेतले
  • भाजपबरोबर युती करताना पीडीपीचा हा अजेंडा हाता. सवातीन वर्षांत हा अजेंडा पूर्ण झाला आहे

ठपका मुफ्ती सरकारवर

जम्मू-कश्मीरातील वाढता दहशतवाद, अशांतता, पत्रकार शूजात बुखारी यांची हत्या, विकासकामांना बसलेली खीळ आणि मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना राज्यकारभार सांभाळण्यात आलेले अपयश यामुळे भाजपने पीडीपीचा पाठींबा काढल्याचे राम माधव यांनी सांगितले. किमान समान कार्यक्रमांवर पीडीपी-भाजप युती झाली होती. तो कार्यक्रम लागू करण्यात मुफ्ती सरकार अपयशी ठरल्याचा ठपकाही माधव यांनी ठेवला. सरकारचा पाठिंबा काढल्याचे पत्र राज्यपाल एन. एन. वोरा यांना दिले आहे. जम्मू-कश्मीरात राज्यपाल राजवट लागू करावी अशी मागणीही त्यांनी केली.

पक्षीय बलाबल

  • एकूण जागा- ८७
  • पीडीपी- २८
  • भाजप-२५
  • नॅशनल कॉन्फरन्स -१५
  • काँग्रेस -१२
  • अपक्ष-०७

बहुमतासाठी ४४ आमदारांचे संख्याबळ हवे. कोणाकडेच बहुमताचा आकडा नाही. पीडीपी-नॅशनल कॉन्फरन्स एकत्र आले तर ४३ चा आकडा होतो. अपक्षांचा पाठिंबा घेतल्यास काठावर बहुमत मिळू शकते, पण आता हे होणार नाही.