भाजपच्या बैठकीत कार्यकर्त्यांचा महागाईच्या विरोधात आक्रोश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
bjp logo flag

लोकांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी चिंतन केले पाहिजे, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा करत असताना कार्यकर्त्यांनी मात्र महागाईच्या झळा कमी करा, असा आक्रोश केला.

बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या राज्य कार्यसमितीच्या बैठकीला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जे.पी. नड्डा यांनी काँग्रेस आणि भाजपने केलेल्या विकासकामांची तुलना करीत काँग्रेसवर टीका केली. एकीकडे फडणवीस, नड्डा कार्यकर्त्यांमध्ये आलेली निराशा दूर करण्यासाठी भाषणबाजी करत होते, तर दुसरीकडे आमदार, खासदार, मंत्री आणि कार्यकर्ते पेंगत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरण्यासाठी आलेल्या नेतेमंडळींच्या चेहऱयावरच निरुत्साह दिसत होता, तर कार्यकर्ते मात्र झोपा काढताना दिसत होते. महागाईच्या झळा लागलेले कार्यकर्ते मात्र गॅसच्या किमती कमी करण्याची मागणी आपल्या राष्ट्रीय नेत्यांकडे करत होते; मात्र त्यांचे ऐकून घेण्यास कोणी तयार नव्हते.